Two Youths Flowed In River From India To Pakistan: पंजाबमधील लुधियाना येथील दोन तरुण सुतलेज नदीच्या जोरदार प्रवाहामध्ये वाहून थेट पाकिस्तानात गेल्याचा प्रकार समोर आला आहे. पाकिस्तानी पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतलं आहे. पंजाब पोलिसांनी ही माहिती दिली आहे. मागील काही आठवड्यांपासून पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून अनेक नद्यांमधील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. काही नद्यांना पूरही आला आहे. अशाच एका वेगवान प्रवाहामध्ये हे दोन्ही तरुण वाहून गेल्याचा प्राथमिक अंजाद व्यक्त केला जात आहे. सध्या या तरुणांसंदर्भात पाकिस्तानी अधिकाऱ्यांशी भारतीय अधिकारी चर्चा करत असून यासंदर्भातील माहिती या तरुणांच्या कुटुंबियांनाही देण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लुधियानामधील जगरौन येथील सिधवा बेट येथील रहिवासी असलेले रतनपाल आणि हरविंदर सिंग यांना पाकिस्तानी रेंजर्सने शनिवारी ताब्यात घेतलं. यासंदर्भातील माहिती पाकिस्तानी रेंजर्सने सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) अधिकाऱ्यांना दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमध्ये वाहून गेलेले दोघेजण लुधियानावरुन फिरोजपूरमध्ये कसे पोहोचले याची माहिती समोर आलेली नाही. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी रेंजर्सकडून जेव्हा या दोघांना भारताच्या ताब्यात सोपवलं जाईल तेव्हाच खरी माहिती समोर येईल.
"शनिवारी आम्हाला यासंदर्भातील माहिती मिळाली की पाकिस्तानी रेंजर्सने 2 भारतीयांना ताब्यात घेतलं आहे. सुतलेज नदीमधून वाहत वाहत हे दोघे पाकिस्तानामध्ये पोहचल्याचा त्यांचा दावा आहे. यासंदर्भात शनिवारी आणि रविवारी पाकिस्तानी रेंजर्स आणि बीएसएफच्या अधिकाऱ्यांमध्ये फ्लॅग मीटिंग झाली."
समोर आलेल्या माहितीनुसार, रविवारी पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2 तरुण सुतलेज नदीच्या वेगवान प्रवाहाबरोबर वाहून गेले. फिरोजपूरमधील स्टेशन अधिकारी बचन सिंह यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पाकिस्तानी रेंजर्सने या दोघांना पकडल्याचंही सांगितलं आहे. या 2 तरुणांची ओळख पटली आहे.
सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी पाकिस्तानी रेंजर्सबरोबर चर्चा केली आहे. पाकिस्तानमध्ये ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणांच्या कुटुंबियांना याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. त्यांना काय काय कारवाई केली जात आहे याची माहिती दिली जातेय. "नदीतून वाहत हे तरुण पाकिस्तानात गेल्याची माहिती आम्ही त्यांना दिली आहे. यानंतर पाकिस्तानी रेंजर्सबरोबर आमची फ्लॅग मिटींग झाली. त्यांना सुरक्षित परत आणण्यासंदर्भातील काही पूर्तता झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल," असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. या दोघांचे नातेवाईक लवकरच फिरोजपूरमध्ये दाखल होणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे.