उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं, संजय राऊत यांची मागणी

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज्यात महाशिवआघाडीच्या सरकार स्थापनेचे सकारात्मक संकेत दिले आहेत

Updated: Nov 20, 2019, 09:25 PM IST
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं, संजय राऊत यांची मागणी

नवी दिल्ली : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज्यात महाशिवआघाडीच्या सरकार स्थापनेचे सकारात्मक संकेत दिले आहेत. यानंतर लगेचच शिवसेना नेते संजय राऊत यांनी सूचक विधान केलं आहे. उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावं, अशी जनतेची इच्छा आहे, असं वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे. शिवतीर्थावर जेव्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेईल तेव्हा नाव कळेल. शपथविधी लपून छपून होत नाही, अशी प्रतिक्रियाही संजय राऊत यांनी दिली आहे.

शिवसेनेचा मुख्यमंत्री कोण होणार हे काँग्रेस-राष्ट्रवादीने विचारलं असेल तर त्यांना नाव सांगितलं आहे, असं राऊत म्हणाले. तसंच आघाडीच्या बैठकीनंतर शरद पवारांना भेटायला जाऊ शकतो. उद्धव ठाकरे यांच्या आपण सतत संपर्कात आहोत. पेढ्यांची ऑर्डर दिली आहे, लवकरच गोड बातमी मिळेल, असं राऊत यांनी सांगितलं.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करायला हिरवा कंदिल दिला असला तरी या दोन्ही पक्षातील चर्चा सुरुच राहणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर पृथ्वीराज चव्हाण आणि नवाब मलिक यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

लवकरच राज्यात स्थिर आणि लोकाभिमुख सरकार देऊ, असं वक्तव्य काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी या बैठकीनंतर दिलं आहे. दोन्ही पक्षांमध्ये सकारात्मक चर्चा झाली आहे. आज आणि उद्यादेखील काही मुद्द्यांवर चर्चा होणार आहे, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.

दुसरीकडे लवकरच महाराष्ट्रात पर्यायी सरकार देऊ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे. तीन पक्षसोबत आल्याशिवाय महाराष्ट्रात सरकार स्थापन होणार नाही, त्यामुळे राज्यात लवकरच पर्यायी सरकार येईल, असं नवाब मलिक यांनी सांगितलं.

शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये किमान समान कार्यक्रम ठरवला जात आहे. यासाठी दोन्ही पक्षांच्या बड्या नेत्यांच्या दिल्लीमध्ये बैठका सुरु आहेत. याचवेळी तिन्ही पक्षांमधल्या सत्तास्थापनेच्या संभाव्य फॉर्म्युलाची चर्चा सुरु झाली आहे. यामध्ये शिवसेनेला मुख्यमंत्रिपदासह १६ मंत्रिपद, राष्ट्रवादी काँग्रेसला १५ मंत्रिपद आणि काँग्रेसला १२ मंत्रिपदं मिळू शकतात. तसंच अडीच वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रिपद मिळू शकतं.