Nitin Gadkari on Congress: भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी काँग्रेस (Congress) पक्षासंबंधी एक मोठं विधान केलं आहे. काँग्रेसच्या एका नेत्याने आपल्याला त्यांच्या पक्षात प्रवेश करण्याची ऑफर दिली होती असा खुलासा त्यांनी केला आहे. पण त्यांनी ही ऑफर स्वीकारण्यास नकार दिला होता. काँग्रेसचा सदस्य होण्याऐवजी मी विहिरीत उडी मारेन असं नितीन गडकरी यांनी त्या नेत्याला सांगितलं होतं. नितीन गडकरी यांनीच हा किस्सा सांगितला आहे.
नितीन गडकरी यांना दावा केला आहे, काँग्रेसने सत्तेत असताना 60 वर्षात जितकं काम केलं त्याच्या दुप्पट काम भाजपा सरकारने गेल्या 9 वर्षांत केलं आहे. तसंच काही दिवसांपूर्वी आपण उत्तर प्रदेशात असताना तेथील लोकांना 2024 च्या अखेरपर्यंत राज्यातील सर्व रस्ते अमेरिकेसारखे असतील असं सांगितलं असल्याची माहिती दिली.
नितीन गडकरी शुक्रवारी भंडारा येथे होते. यावेळी त्यांनी एका सभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी सरकारला 9 वर्षं पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारी कामं आणि योजनांची यादीच वाचली. नितीन गडकरी यांनी यावेळी पक्षासाठी आपण काम सुरु केल्याचे दिवस आठवत जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी दिवंगत काँग्रेस नेते श्रीकांत जिचकर यांनी दिलेल्या एका ऑफरची आठवण सांगितली.
नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितलं की, "एकदा जिचकर यांनी मला सांगितलं होतं की, तुम्ही फार चांगले कार्यकर्ते आणि नेते आहेत. जर तुम्ही काँग्रेसमध्ये आलात तर तुमचं भविष्य उज्ज्वल होईल". या ऑफरवर नितीन गडकरी म्हणाले होते की, "काँग्रेसमध्ये सहभागी होण्यापेक्षा मी विहिरीत उडी मारेन. माझा भाजपा आणि त्यांच्या विचारसरणीवर पूर्ण विश्वास आहे. मी यासाठी काम करत राहणार आहे".
नितीन गडकरी यांनी यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) भारतीय विद्यार्थी परिषदेसाठी (ABVP) केलेल्या कामाची आठवण सांगितली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्याला तरुणपणात मूल्यं स्थापन करण्यासाठी मदत केल्याचं सांगत कौतुक केलं.
दरम्यान काँग्रेसचा उल्लेख करत ते म्हणाले की, "पक्ष निर्माण झाल्यानंतर अनेकदा फुटला आहे. आपण देशाची लोकशाही विसरता कामा नये. भविष्यासाठी आपण भुतकाळातून शिकलं पाहिजे. आपल्या 60 वर्षांच्या सत्तेत काँग्रेसने गरिबी हटावची घोषणा दिली. पण वैयक्तित फायद्यासाठी अनेक शैक्षणिक संस्था सुरु केल्या"