मुलाचा हव्यास! 5 मुलींच्या क्रूर बापाने कापलं गर्भवती पत्नीचं पोट

UP Crime:  क्रूर बापाने होणाऱ्या बाळाचे लिंग तपासण्यासाठी गर्भवती पत्नीचं पोट कापलंय. 

Pravin Dabholkar | Updated: May 24, 2024, 07:04 PM IST
मुलाचा हव्यास! 5 मुलींच्या क्रूर बापाने कापलं गर्भवती पत्नीचं पोट title=
Husband Cut Pregnent Wife Stomach

UP Crime: तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल अशी संताप येणारी घटना उत्तर प्रदेशमध्ये घडलीय. मुलगा असावा यासाठी कोण कोणत्या थराला जाईल सांगता येत नाही. अशाच एका क्रूर बापाने होणाऱ्या बाळाचे लिंग तपासण्यासाठी गर्भवती पत्नीचं पोट कापलंय. उत्तर प्रदेशच्या बदायू जिल्ह्यात ही घटना घडलीय. या घटनेतील आरोपीने मानवी संवेदनांच्या चिंधड्या चिंधड्या केल्या आहेत. 

बदायू जिल्ह्याच्या सिव्हिल लाइनमधील मोहल्ला नेकपूर गल्ली नंबर 3 मध्ये पन्नाला राहायचा. त्याची पत्नी अनिता गर्भवती होती. अशा अवस्थेत बायकोची काळजी घेण्याऐवजी त्याने बायकोचे पोट फाडले. पत्नी अनिताच्या पोटात वाढणारं बाळ मुलगा आहे की मुलगी? हे त्याला पाहायचं होतं. त्यावेळी अनिता माहेरी होती. दारुच्या नशेत धुंद असलेला पन्नालाल अनिताजवळ गेला आणि तिच्याशी भांडण करु लागला. 

आतापर्यंत 5 मुलींना जन्म दिलायस. पोटात वाढणारा गर्भ मुलगा आहे की मुलगी? हे मला पोट फाडून बघायचंय, असे तो पत्नीला सांगू लागला. यानंतर अनिता आणि तिच्या मुलींनी मिळून वडिलांना विरोध केला. पण पन्नालाल काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने गर्भवती पत्नीचे पोट कापले. अनिताच्या गर्भातून 8 महिन्यांचे बाळ बाहेर आले. 

घरच्यांनी तात्काळ अनिताला रुग्णालयात दाखल केले. येथून तिला मोठ्या रुग्णालयात जायला सांगितले. तिथे डॉक्टरांनी तिचा जीव वाचवला. पण अनिताच्या गर्भात वाढणाऱ्या मुलाचा हे जग पाहण्याआधीच मृत्यू झाला होता. अनितावर साधारण 8 महिने उपचार सुरु होते. पोलिसांनी पन्नालालवर कलम 307, 313 अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि त्याला तुरुंगात पाठवलं. 

आरोपी मार्चमध्ये जामिनावर बाहेर आला होता. त्याने आपली पत्नी अनिता आणि मुलींना मारहाण केली. कोर्टाच्या निर्णयावरुन दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. अनिताने पतीची मारहाण सहन केली नाही. तिने पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर 3 वर्षानंतर न्यायालयाने आरोपी पन्नालालला दोषी ठरवत आजीवन कारावास आणि 50 हजार दंडाची शिक्षा सुनावली. 

ही रक्कम न भरल्यास 6 महिन्याचा अतिरिक्त कारावास भोगण्याचे निर्देश दिले. पतीच्या या घाणेरड्या, संतापजनक कृत्यानंतर अनिता त्याच्यापासून वेगळी राहत आहे. ती आपल्या पाच मुलींचा संभाळ करतेय. 

19 सप्टेंबर 2020 रोजी ही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली होती. आरोपी पतीला कोर्टाने 3 वर्षानंतर आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच 50 हजार रुपयांचा दंडदेखील ठोठावला आहे. या निर्णयामुळे आपल्याला न्याय मिळाल्याची भावना पत्नीच्या मनात आहे.