'वंदे साधारण' एक्स्प्रेस ट्रायलसाठी मुंबईत; कमी पैशात करता येणार वेगवान अन् आरामदायी प्रवास

Vande Sadharan Express Train: वंदे भारत एक्स्प्रेसनंतर आता वंदे साधारण एक्स्प्रेस गाड्या लवकरच सुरू होणार आहेत. यात सर्व द्वितीय श्रेणीचे डबे असतील. त्यामुळे त्याचे भाडेही कमी असणे अपेक्षित आहे.

आकाश नेटके | Updated: Oct 30, 2023, 09:29 AM IST
'वंदे साधारण' एक्स्प्रेस ट्रायलसाठी मुंबईत; कमी पैशात करता येणार वेगवान अन् आरामदायी प्रवास  title=

Vande Sadharan Express Train: देशभरातील वंदे भारत ट्रेनमधून (Vande Bharat Express) लोक आरामदायी प्रवासाचा आनंद घेत आहेत, पण त्याचे भाडे जास्त आहे. त्यामुळे सामान्यांना या गाड्यांमधून प्रवास करणे कठीण झालं आहे. रेल्वे आता वंदे भारत साधारण एक्स्प्रेस ट्रेन सुरू करणार आहे जेणेकरुन सर्वसामान्य आणि कमी उत्पन्न गटातील सर्वसामान्य लोकांनाही कमी भाड्यात वंदे भारताप्रमाणेच आरामात प्रवास करता येईल. भारतीय रेल्वेकडून (Indian Railway) सर्वसामान्यांसाठी वंदे भारत साधरण ट्रेन चालवण्याची जोरदार तयारी सुरू आहे. पहिली वंदे भारत सामान्य एक्स्प्रेस रविवारी सकाळी चाचणीसाठी मुंबईत पोहोचली आहे. ती चाचणीसाठी माझगाव येथील वाडीबंदर रेल्वे यार्ड येथे ठेवण्यात आली आहे.

वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. मात्र या ट्रेननं प्रवास करणं अनेकांना परवड नाहीये. पण आता भारतीय रेल्वेने सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल अशी वंदे साधारण ट्रेन तयार केली आहे. ही गाडी चेन्नईच्या आयसीएफ फॅक्टरीत तयार करण्यात आली असून ती सध्या मुंबईत मध्य रेल्वेच्या वाडीबंदर यार्डात शनिवारी रात्री दाखल झाली. आवश्यक त्या तपासण्या केल्यानंतर मुंबई-पुणे आणि कसारा-इगतपुरी या घाटमार्गावर तिच्या चाचण्या घेतल्या जाणार आहेत.

वाडीबंदर रेल्वे यार्ड येथे अधिकाऱ्यांनी ट्रेनची पाहणी केली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर मुंबई-पुणे आणि कसारा-इगतपुरी या घाटमार्गावर ट्रेनच्या चाचण्या होणार आहेत. मात्र, या ट्रेनचे नाव अद्याप औपचारिकरित्या ठेवण्यात आलेले नाही. ही ट्रेन वंदे भारत एक्स्प्रेस सारखीच आहे, पण तिला विनावातानुकूलित (नॉन-एसी) डबे असतील. त्यामुळे वंदे साधरण एक्स्प्रेसचे भाडेही कमी होणार आहे. 

ही ट्रेन चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये तयार करण्यात आली आहे. त्याची किंमत 65 कोटी रुपये आहे. यात 22 कोच आहेत ज्यात 12 स्लीपर क्लास कोच, आठ जनरल कोच आणि दोन गार्ड कोच आहेत. दोन्ही टोकांना इलेक्ट्रिक इंजिन आहेत. दोन्ही बाजूला इंजिन असलेले पुश-पुल तंत्रज्ञानामुळे आरामदायी प्रवास करता येणार आहे.. या ट्रेनमध्ये सुमारे 1,800 प्रवासी प्रवास करू शकतील.

या मार्गावर धावणार सामान्य वंदे भारत

पाटणा-नवी दिल्ली
हावडा - नवी दिल्ली
हैदराबाद - नवी दिल्ली
मुंबई - नवी दिल्ली
एर्नाकुलम - गुवाहाटी