जयपूर: राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेत्या वसुंधरा राजे स्वत:ला आयसोलेट करून घेतले आहे. काही वेळापूर्वीच बॉलिवूड गायिका कनिका कपूर हिची कोरोना टेस्ट (COVID-19) पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले होते. वसुंधरा राजे यांनी काही दिवसांपूर्वी बॉलिवूड गायिका कनिका कपूर हिने लखनऊमध्ये आयोजित केलेल्या पार्टीला हजेरी लावली होती.
या पार्टीमध्ये अनेक बॉलिवूड स्टार्स आणि नामांकित व्यक्ती उपस्थित होत्या. या पार्टीला वसुंधरा राजे आणि त्यांचा मुलगा दुष्यंत हेदेखील उपस्थित होते. त्यामुळे सावधगिरीचा उपाय म्हणून वसंधुरा राजे आणि दुष्यंत सिंह यांनी स्वत:ला इतरांपासून वेगळे करण्याचा निर्णय घेतला. आम्ही योग्य ती काळजी घेत असल्याचे वसुंधरा राजे यांनी सांगितले. त्यामुळे आता या पार्टीला उपस्थित असणाऱ्या इतर लोकांनाही कोरोनाची लागण झाल्याचा संशय बळावला आहे. या पार्टीमध्ये बॉलिवूडचे जवळजवळ १०० सेलिब्रेटी सहभागी झाल्याची माहिती आहे. तसेच अनेक बडे राजकीय नेतेही पार्टीला उपस्थित होते. त्यामुळे आता आरोग्य विभागाकड़ून पार्टीला उपस्थित असणाऱ्या लोकांचा शोध घेतला जात आहे.
Vasundhara Raje,BJP leader:While in Lucknow,I attended a dinner with my son Dushyant&his in-laws. Kanika, who has unfortunately tested positive for #Covid19 was also a guest. As a matter of abundant caution, my son&I have immediately self-quarantined&we’re taking all precautions. pic.twitter.com/MD3r0XZXu4
— ANI (@ANI) March 20, 2020
आजच कनिका कपूर हिला कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली. कनिका १५ मार्चला लंडनहून भारतात परतली होती. मात्र, कनिकाने आपली ट्रॅव्हल हिस्ट्री लपवून ठेवल्यामुळे ही बाब इतक्या उशिराने समोर आली. दरम्यानच्या काळात कनिकाने फक्त एक पार्टीच दिली नाही, तर लखनऊ येथील अनेक पार्ट्यांना तिने हजेरीही लावली होती.