Video Train Stuck In Traffic: 'काम झाल्याशी मतलब' हा भारतीयांचा अनेक गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टीकोन असतो. यासाठी मग जमेल तशी तडजोड करण्यात भारतीयांचा हात कोणीच धरु शकत नाही. मात्र हे काम करुन घेण्याच्या नादात इतरांनाही काहीजण अडचणीत टाकतात. बरं भारतीयांच्या शिस्तीवरुनही अनेकदा बोललं जातं. खास करुन सार्वजनिक ठिकाणी वाहन चालवताना पाळले जाणारे नियम आपल्यासाठी नाहीच असं काही भारतीयांना वाटतं अशी टीकाही अनेकदा स्टॅण्डअप कॉमेडीमधून वगैरे ऐकायला मिळते. खरं तर भारत हा जगातील सर्वाधिक रस्त्यांचं जाळं आणि रेल्वे मार्ग असलेल्या देशांमध्ये अव्वल काही देशांपैकी एक आहे. मात्र खरोखरच भारतीयांना ट्रॅफिक (Traffic) सेन्स म्हणजेच वाहतुकीच्या नियमांसंदर्भातील गांभीर्य फार कमी आहे की काय असा प्रश्न पडण्यासारख्या घटना वेळोवेळी समोर येत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
व्हायरल झालेला हा व्हिडीओ उत्तर प्रदेशमधील बनारस येथील आहे. भारतात अनेक ठिकाणी आजही रेल्वे मार्गावरुन जाणारे रस्ते आहेत. अशा ठिकाणी फाटक लावून ट्रेन येताना वाहतूक थांबवली जाते. ट्रेन गेल्यानंतर पुन्हा या मार्गावरुन जाणाऱ्या गाड्यांची म्हणजेच रस्ते वाहतूक पूर्वव्रत केली जाते. मात्र अशा फाटकावर गाड्या थांबल्याच नाही तर? बनारसमध्ये असाच प्रकार घडला असून येथे अशाच एका रेल्वे फाटकावर चक्क एक एक्सप्रेस ट्रेन ट्रॅफिकमध्ये अडकल्याचं दिसत आहे.
सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओमध्ये, 'भारत हा नव्याने जग पाहण्यास सुरुवात करणाऱ्यांसाठीचा देश नाही,' अशा उपहासात्मक डिस्क्रीप्शनसहीत हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर 'बनारसच्या ट्रॅफिकमध्ये ट्रेन अडकली' अशी ओळ लिहिलेली आहे. हा व्हिडीओ दोन रेल्वे फाटकांदरम्यान कारमधून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीने काढला असून व्हिडीओच्या उजव्या बाजूला एक ट्रेन थांबलेली दिसत आहे. तर डाव्याबाजूला वाहतूक कोंडी दिसून येत आहे. या ट्रेनच्या समोरुन वाहने ये जा करत असून ट्रेनचा मोटरमन मात्र हॉर्न वाजत आहे. ट्रेनच्या हॉर्नचा आवाज व्हिडीओत स्पष्टपणे येत आहे. ज्या गाडीमधून व्हिडीओ काढण्यात आला आहे तिच्या समोरच उभं राहून एक पोलीस कर्मचारी वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. ट्रॅफिक क्लिअर करुन ट्रेनला मार्ग मोकळा करुन देण्याचा प्रयत्न पोलीस करताना दिसत आहेत. मात्र ट्रेनच्या ट्रॅकवरुन जाणाऱ्या गाड्या काही थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीत. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ
India is not for the beginners pic.twitter.com/sSFLZWS3BK
— BALA (@erbmjha) August 13, 2023
हा व्हिडीओ पाहून अनेकांनी भारतात काहीही होऊ शकतं असं म्हटलं आहे. हा 25 सेकंदांचा व्हिडीओ हजारो लोकांनी शेअर केला आहे.