मुंबई : स्वतःवर विश्वास असेल तर आपण कोणतीही गोष्ट करू शकतो. कोणतीच गोष्ट ही अशक्य नसते. ज्या व्यक्तीचा स्वतःवर विश्वास नसतो, तो त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचण्याआधीच अडखळतो, तर स्वतःवर विश्वास असेल तर तो माणूस हसत हसत प्रत्येक अडथळे पार करतो. कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवणं किती महत्त्वाचं आहे, याची साक्ष देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हीलचेअरवरून फूड डिलिव्हरीचं काम करणाऱ्या अपंग व्यक्तीचा आहे. पाय नाहीत म्हणून काय झालं, राबण्यासाठी हात तर आहेत, असा विचार करून हा झोमॅटो फूड डिलिव्हरी बॉय सध्या सोशल मीडियावर चर्चेत आलाय. व्हीलचेअरवर बसून हा झोमॅटो डिलिव्हरी बॉय घरोघरी फूड डिलिव्हरी करण्याचं काम करत आहे. जे लोक एकेकाळी या व्यक्तीकडे दयेने पाहत होते, आज तेच लोक या झोमॅटो फूड डिलिव्हरी बॉयकडे कौतुकाने पाहत आहेत. हा फूड डिलिव्हरी बॉय पायाने अपंग असला तरी तो स्वतःच्या पायावर उभा आहे आणि स्वतःची जबाबदारी सांभाळत आहे. डिलिव्हरी बॉयचा हा व्हिडीओ सर्वांच्याच मनाला भिडणारा आहे. काहीलोक भावूकही होत आहेत.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय व्हीलचेअरवर बसून डिलिव्हरी देण्याच्या ठिकाणाकडे जात आहे. व्हीलचेअरमध्ये मोटर आहे, ज्यामुळे ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आरामात जाऊ शकते. आत्तापर्यंत तुम्ही डिलिव्हरी एजंटला सायकल, बाईकवरच तुमच्या जेवणाची डिलिव्हरी देताना पाहिले असेल. पण आता लोकांनी या व्हीलचेअर फूड डिलिव्हरी एजंटला पाहिले तेव्हा ते भावूक झाले. मात्र, बहुतांश लोक या डिलिव्हरी बॉयचे खूप कौतुक करत आहे.
या व्हायरल व्हिडीमधल्या अपंग फूड डिलिव्हरी बॉयचं नाव गणेश मुरुगन असं असून ६ वर्षांपूर्वी एका अपघातात त्याच्या पाठीच्या कण्याला मोठी दुखापत झाली होती. गणेशला ट्रकनं धडक दिल्याने तो अपंग झाला. IPS अधिकारी दिपांशू काब्रा यांनी त्याची कहाणी ट्विटरवर शेअर केली होती. त्याची टू-इन-वन व्हीलचेअर, आयआयटी मद्रास येथील एका स्टार्ट-अपने विकसित केली आहे, सहज वाहतूक करण्यासाठी मोटार देखील बसवण्यात आली आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर प्रचंड व्हायरल होत आहे. काही लोकांनी तर लिहिलंय की हे आयुष्य माणसांना काय काय करायला लावेल सांगता येत नाही. हा व्हिडीओ groming_bulls_ नावाच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर झाल्यानंतर जवळपास 1.1 मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत. तर 1 लाख 51 हजारांपेक्षा जास्त लोकांनी लाईक केले आहे. ही संख्या सातत्याने वाढत आहे.