पुलवामा हल्ल्यानंतर दोन आठवड्यांनी पुतिन यांनी केला नरेंद्र मोदींना फोन

पुतिन यांनी पुलवामा येथे हल्ला आणि शहीद जवानांबद्दल संवेदनाही व्यक्त केल्या

Updated: Mar 1, 2019, 09:58 AM IST
पुलवामा हल्ल्यानंतर दोन आठवड्यांनी पुतिन यांनी केला नरेंद्र मोदींना फोन title=

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन केला आणि त्यांच्याशी फोनवरून चर्चा केली. पुलवामा येथे हल्ला आणि शहीद जवानांबद्दल त्यांनी त्यांच्या संवेदनाही व्यक्त केल्या. इतकंच नाही तर दहशतवादाविरोधात रशिया भारतासोबत आहे असं वचनही त्यांना दिलं. पुलवामाचा हल्ला ही दुःखद घटना असल्याचं पुतिन यांनी म्हटलं आहे. दहशतवादाविरोधात भारत जी कारवाई करतो आहे त्याला रशियाने साथ दिल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुतिन यांचे आभार मानले आहेत. दोन्ही नेत्यांनी फोनवरून केलेल्या चर्चेत दहशतवादाचा खात्मा करण्यासाठी सज्ज असल्याचं स्पष्ट करण्यात आलं.

दरम्यान या वर्षाच्या शेवटी व्लादिवोस्तोक या ठिकाणी होणाऱ्या इस्टर्न इकॉनॉमिक फोरममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही सहभागी व्हावं असं निमंत्रणही पुतिन यांनी दिलं.

१४ फेब्रुवारी रोजी जम्मू-काश्मीरमधल्या पुलवामा भागात 'जैश ए मोहम्मद' या दहशतवादी संघटनेकडून सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या आत्मघातकी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले. त्यानंतर मंगळवारी सकाळी, भारतीय वायुदलाच्या लढाऊ विमानांनी मोठी कारवाई करत नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधल्या बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक घडवून आणली. त्यानंतर भारत - पाकिस्तान दरम्यान तणाव कायम आहे.