मुंबई : लोकसभा निवडणूका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. परंतु तरीही अनेक मतदारांचे नाव मतदान यादीत नसल्याने मतदारांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. मतदान यादीत नाव नसले तरी आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र दाखवून मतदान करता येईल असा मेसेज व्हॉट्सअॅपवर व्हायरल होत आहे. परंतु हा मेसेज खोटा असल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आहे. मतदान यादीत नाव असल्याशिवाय कोणालाही मतदान करता येणार नसल्याचे निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मतदान करण्यासाठी आपल्या मतदार संघाच्या मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे. व्हॉट्सअॅपवरील या खोट्या मेसेजबाबत निवडणूक आयोगाने हे स्पष्टीकरण दिले आहे.
मतदान ओळखपत्र असेल आणि मतदार यादीत नाव नसेल तर मतदान करता येणार नाही. परंतु जर मतदान यादीत नाव आहे मात्र मतदान ओळखपत्र नसेल तरीही त्या व्यक्तीला मतदान करता येणार आहे. ओळखपत्र नसल्यास मतदान करण्यासाठी जाताना वाहन परवाना, आधार कार्ड, पॅन कार्ड असे कोणतेही सरकारी ओळखपत्र घेऊन जाणे आवश्यक आहे. मतदान यादीत नाव नसले तरी आधारकार्ड किंवा मतदान ओळखपत्र दाखवून चॅलेंज वोटनुसार मतदान करता येईल हा खोटा मेसेज असून मतदान करण्यासाठी यादीत नाव असणे गरजेचे आहे.
या मेसेजमध्ये टेंडर वोट बाबतही चुकीची माहिती देण्यात आली आहे. मतदान यादीतील मतांमध्ये १४ टक्के टेंडर वोट असल्यास त्या मतदान केंद्रावर फेरमतदान घेण्यात येईल हेदेखील खोटे असून अशी कोणतीही तरतूद केली नसल्याचे निवडणूक कार्यालयाने सांगितले आहे.