अयोध्या : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५ वर्षात प्रथमच अयोध्येत सभा घेतली पण आत्तापर्यंतच्या प्रचारातलं सर्वात लहान भाषण केलं. संपूर्ण २२ मिनिटांच्या भाषणात मोदींनी एकदाही राममंदिराचा उल्लेख केला नाही. त्यामुळे अनेकांची निराशा झाली. मोदींनी आपल्या भाषणात जय श्रीरामचा नारा मात्र दिला. पंतप्रधानांनी विकासकामांचा पाढा नेहमीप्रमाणे वाचला. सपा बसपा, काँग्रेसवरही मोजकी टीका केली. पर्यटनासाठी रामायण सर्कीटचा उल्लेख केला. पण राममंदिराचा उल्लेख मोदींनी जाणीवपूर्वक टाळला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येत आहेत. मोदींचं इक्बाल अंसारी यांनी स्वागत केलं. त्यांच्या येण्यानं अयोध्येचा विकास होईल असं मत यावेळी वक्फ बोर्डाच्या इक्बाल अंसारी यांनी व्यक्त केलं.
अयोध्येत असूनही मोदी रामलल्लाचं दर्शन घेणार नसल्याने मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राम मंदिर उभारण्याचं वचन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पूर्ण केलं नाही. त्यामुळे राम मंदिर उभारण्याची सरकारची इच्छाशक्ती नसल्याचा आरोपही त्यांनी केला.