आपचं ठरलंय, गोव्यात वारं फिरलयं

उत्पल पर्रीकर 'आप'कडून लढणार? अरविंद केजरीवाल यांचे खुले आवाहन

Updated: Jan 18, 2022, 07:28 PM IST
आपचं ठरलंय, गोव्यात वारं फिरलयं title=

पणजी : गोव्याच्या राजकारणात कमालीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. निवडणुकीत विजयी होण्यासाठी प्रत्येक पक्षाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत आहेत ते माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांचे पुत्र उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar)

माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचा पणजी हा मतदारसंघ. मात्र, त्यांच्या निधनानंतर भाजपने या जागेवरुन सिद्धार्थ श्रीपाद कुंकळ्ळीकर यांना तिकीट दिले होते. मात्र, या निवडणुकीत वडिलांनी ज्या मतदारसंघातून समाजकारण केले तिथून निवडणूक लढवणारच असा निर्धार करत उत्पल यांनी पणजीमध्ये घरोघरी जावून प्रचारही सुरु केला.

परंतु, भाजपने उत्पल यांच्याऐवजी बाबूश मोन्सेरात ( babhush monseraat ) याना संधी देण्याचे निश्चित करत उत्पल यांच्या निर्धाराला खो घातला. उत्पल यांनी दिल्लीला जाऊन पक्षश्रेष्ठींशी चर्चा केली. त्यावेळी त्यांना ही जागा बाबूश मोन्सेरात यांनाच देणे सोयीस्कर असेल, कारण ते निवडून येण्याची शक्यता जास्त आहे, असे समजावण्यात आले. 

उत्पल यांनी हार न मानता पक्षाचा पाठिंबा नसल्याचे गृहीत धरून अपक्ष निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. शिवसेना ( shivsena ) नेते खा. संजय राऊत ( sanjay raut ) यांनी त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्याची ऑफर दिली आहे.

तर, आपचे नेते अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांनी गोव्यात घरोघरी प्रचार केला आहे. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी 'मी स्व. मनोहर पर्रीकर यांचा मनापासून आदर करतो. सध्या त्यांच्या मुलाबद्दल चाललेल्या चर्चा माहीत आहेत. त्यांना जर निवडणूक लढवायची असेल आणि त्यांना जर आम आदमी पक्षात यायचे असेल तर त्यांचे स्वागत आहे.' असे सांगून खुले आवाहन केले आहे. 

स्वपक्षाने डावलल्यामुळे नाराज असलेले उत्पल पर्रीकर आता शिवसेनेच्या सेनेत सामील होतात की 'आप'ला आपलेसे करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.