राजकारणासाठी आजारी व्यक्तीचा वापर करण्याची वृत्ती चांगली नव्हे- पर्रिकर

राजकीय मतभेद विसरून आपण भेटायला आलात, याबद्दल मला समाधान वाटले.

Updated: Jan 30, 2019, 07:17 PM IST
राजकारणासाठी आजारी व्यक्तीचा वापर करण्याची वृत्ती चांगली नव्हे- पर्रिकर title=

पणजी: गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी बुधवारी राफेल करारासंदर्भात अपप्रचार करणारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना खडसावले. राहुल यांनी मंगळवारी पर्रिकर यांच्या प्रकृतीची विचारपूर करण्यासाठी त्यांची भेट घेतली होती. मात्र, या भेटीदरम्यान पर्रिकर यांनी राफेल करारासंदर्भात नवा गौप्यस्फोट केल्याचा दावा राहुल यांनी केला होता. परंतु, आमच्या भेटीत राफेलसंदर्भात कोणताही चर्चा झाली नाही. आजारी व्यक्तीला भेटल्यानंतर त्याच्या वापर राजकारणासाठी करण्याची वृत्ती चांगली नाही, असे मनोहर पर्रिकर यांनी स्पष्ट केले. पर्रिकर यांनी राहुल यांना दोन पानी पत्र लिहिले असून त्यांचा दावा खोडून काढला आहे. 

सुट्टीसाठी गोव्यात आलेल्या राहुल यांनी मंगळवारी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये काही वेळ चर्चाही झाली. यानंतर पणजीत झालेल्या सभेत या भेटीबद्दल सांगितले. त्यांनी म्हटले की, माजी संरक्षणमंत्र्यांशी मी चर्चा केली. तेव्हा त्यांनी स्पष्ट केले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राफेल विमानांच्या खरेदीसाठी फ्रान्सशी नव्याने केलेल्या करारात माझी कोणतीही भूमिका नव्हती. हा दावा करून राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले होते. 

या पार्श्वभूमीवर पर्रिकर यांनी राहुल यांच्या दाव्याचे खंडन केले. कोणतीही पूर्वसूचना न देता राहुल गांधी यांनी भेटीसाठी वेळ मागितली. राजकीय मतभेद विसरून आपण भेटायला आलात, याबद्दल मला समाधान वाटले. मात्र, राफेलबाबत आपल्यात चर्चा झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमातून समजले आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला. तुम्ही माध्यमांना जी माहिती दिलीत, ते वाचून मला वेदना झाल्या आहेत. प्रकृतीची चौकशी करण्याच्या नावाखाली माझी भेट घेऊन त्याचा उपयोग राजकीय स्वार्थासाठी करण्याचा जो प्रकार आपण केला आहे. त्याची मी कधीही कल्पना केली नव्हती, असेही पर्रिकर यांनी राहुल यांना सुनावले.