नवी दिल्ली - भारतात व्हॉट्सऍपचा वापर करणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. कोणत्याही स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सऍप असतेच आणि अगदी नव्याने मोबाईल वापरणाऱ्याकडूनही व्हॉट्सऍपचा वापर केला जातोच. पण अलीकडे ऑनलाईन क्षेत्रातील चोरट्यांकडून व्हॉट्सऍपच्या माध्यमातून वापरकर्त्यांची माहिती चोरून त्यांना गंडा घालण्याचे प्रकार सर्रास सुरू झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून विमानाची फुकट तिकीटे, व्हॉट्सऍप गोल्ड अपडेट्स, केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत योजनेसाठी नोंदणी अशा स्वरुपाचे मेसेज वेगवेगळ्या नागरिकांना पाठवले जातात. या मेसेजसोबत एक लिंक असते. या लिंकच्या माध्यमातून नागरिकांना आर्थिक गंडा घालण्याचे काम चोरट्यांकडून केले जात आहे. त्यामुळे अशा स्वरुपाचे मेसेज क्लीक करू नका आणि इतरांना फॉरवर्डही करू नका, असे पोलिसांनी स्पष्ट केले.
विविध योजना किंवा फसव्या घोषणा असणारे मेसेज व्हॉट्सऍपमध्ये येतात. त्यावेळी त्याच्यासोबत एक लिंक दिलेली असते. जर कोणत्याही मोबाईल वापरकर्त्याने या लिंकवर क्लीक केले. तर त्याच्या मोबाईलमध्ये मॅलवेअर सॉफ्टवेअर डाऊनलोड होते. त्यानंतर तुम्हाला अशा एका पेजवर नेले जाते. तिथे तुमची वैयक्तिक माहिती मागितलेली असते. ज्यामध्ये तुमच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा नंबरही घेतला जाऊ शकतो. जर मोबाईल वापरकर्त्याने ही माहिती भरली. तर त्याच्या बॅंक खात्यातून पैसे काढून घेतले जाऊ शकतात. त्यामुळे अशा स्वरुपाच्या कोणत्याही मेसेजवर किंवा त्याखाली देण्यात आलेल्या लिंकवर अजिबात क्लीक करू नका.
कोणत्या बनावट योजनांच्या आधारे फसवणूक होते...
व्हॉट्सऍप गोल्ड
व्हॉट्सऍप गोल्ड हे नवीन ऍप येत असल्याची फसवी घोषणा गेल्या काही दिवसांपासून फिरते आहे. हे ऍप डाऊनलोड करण्यासाठी काही लिंकही दिल्या जात आहेत. पण खरंतर या फसव्या लिंक्स आहेत. त्या तुमच्या मोबाईलमध्ये मॅलवेअर डाऊनलोड करण्यासाठी चोरट्यांकडून फिरवल्या जात आहेत. त्यामुळे त्यावर अजिबात क्लिक करू नका.
मोफत विमान तिकिटे
काही विमान कंपन्या प्रवाशांना मोफत तिकिटे देत असल्याचे फसवे मेसेज काही जणांच्या व्हॉट्सऍपवर पाठवले जात आहेत. या मेसेजसोबत त्याच विमान कंपनीच्या नावाशी साधर्म्य असलेल्या एका वेबसाईटची लिंक दिलेली असते. काही दिवसांपूर्वी सिंगापूर एअरलाईन्सच्या नावाने अशीच एक फसवी लिंक मोबाईलवर फिरवण्यात आली होत.
आयुष्यमान भारत योजनेसाठी नोंदणी
केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत आरोग्य योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा, असाही एक मेसेज व्हॉट्सऍपवर पसरविण्यात आला होता. पाच लाख रुपयांपर्यंतच्या विम्यासाठी येथे नोंदणी करा, असा संदेश देणारा एक मेसेज अशाच पद्धतीने काही दिवसांपूर्वी व्हॉट्सऍपवर आला होता. त्यामध्येही एक फसवी लिंक होती. ज्याद्वारे तुमची वैयक्तिक माहिती काढून घेतली जात होती.