मोदींचे विश्वासू, दोनदा केंद्रीय मंत्री; आता महाराष्ट्रात भाजपला विधानसभा जिंकवण्याची जबाबदारी! कोण आहेत भुपेंद्र यादव?

Who is Bhupendra Yadav: . महाराष्ट्रासाठी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव महाराष्ट्राचे भाजप प्रभारी तर अश्विनी वैष्णव भाजप सहप्रभारी असणार आहेत. 

Pravin Dabholkar | Updated: Jun 17, 2024, 02:34 PM IST
मोदींचे विश्वासू, दोनदा केंद्रीय मंत्री; आता महाराष्ट्रात भाजपला विधानसभा जिंकवण्याची जबाबदारी! कोण आहेत भुपेंद्र यादव? title=
Bhupendra Yadav Maharashtra

Who is Bhupendra Yadav: लोकसभा निवडणुकीत भाजपच्या  400 पारच्या नाऱ्याला महाराष्ट्रातून सुरुंग लागला. मोदींच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवणाऱ्या महाविकास आघाडीला येथे फारसा चमत्कार करता आला नाही. दुसरीकडे पक्षफुटीनंतरही महाविकास आघाडीने जास्त जागा जिंकल्या. त्यामुळे विधानसभेसाठी भाजप कामाला लागली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची तयारी सुरु आहे. महाराष्ट्रासाठी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव महाराष्ट्राचे भाजप प्रभारी तर अश्विनी वैष्णव भाजप सहप्रभारी असतील अशी माहिती समोर येत आहे. 

दोन पक्ष फोडल्याच्या विधानामुळे बिघडलेली भाजपची प्रतिमा, मराठा आरक्षणसंदर्भात मनोज जरांगेंच्या मागण्या पुर्ण करण्यात चाललेली ओढाताण, भाजपमधी अंतर्गत वाद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला एकत्र घेऊन चालणे अशा अनेक फ्रण्टवर ताळमेळ राखण्याचे महत्वाचे आव्हान भुपेंद्र यादव यांच्यासमोर असणार आहे. दरम्यान भुपेंद्र यादव कोण आहेत? याबद्दल जाणून घेऊया. 

मोदी 3.0 अंतर्गत भूपेंद्र यादव यांनी पहिल्यांदाच राजस्थानमधून लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकलीदेखील. त्यांच्या या यशामुळे भूपेंद्र यादव हे मोदींच्या नवीन मंत्रिमंडळात दुसऱ्यांदा केंद्रीय मंत्री बनले आहेत. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यापूर्वी गेल्या टर्ममध्ये भूपेंद्र यादव यांना राज्यसभेतून निवडून आणून त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात सामील करण्यात आले होते. पंतप्रधान मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील यादव यांची ही दुसरी टर्म आहे. 

विद्यार्थी राजकारण ते अधिवक्ता परिषदेचे सरचिटणीस 

भूपेंद्र यादव यांचा जन्म 30 जून 1969 रोजी राजस्थानमधील अजमेर येथे झाला. अजमेरच्या सरकारी महाविद्यालयातून त्यांनी ग्रॅज्युएश आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचे शिक्षण घेतले. यानंतर त्यांनी  राजकारणाकडे वाटचाल केली. भूपेंद्र यादव यांची राजकीय कारकीर्द विद्यार्थी राजकारणापासून सुरू झाली. 2000 साली ते विद्यार्थी राजकारणात सक्रिय होते. त्यांना वकील संघटनेचे अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेचे सरचिटणीस बनवण्यात आले आणि 2009 पर्यंत ते या पदावर होते. राजकीय कारकीर्द सुरू करण्यापूर्वी ते सर्वोच्च न्यायालयात वकील होते आणि महत्त्वाच्या आयोगांसाठी सरकारी वकील म्हणूनही काम केले होते.

भाजपचे राष्ट्रीय सचिव

भूपेंद्र यादव यांची 2010 मध्ये तत्कालीन राष्ट्रीय पक्षाध्यक्ष नितीन गडकरी यांनी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्ती केली होती. 4 एप्रिल 2012 रोजी ते राज्यसभेचे खासदार म्हणून निवडून आले. पक्षाच्या स्ट्रॅटर्जी वॉर रूममध्ये त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. जुलै 2021 मध्ये, यादव यांचा मोदी मंत्रिमंडळात पर्यावरण, वन आणि हवामान बदल आणि कामगार आणि रोजगार मंत्री म्हणून समावेश करण्यात आला. 

सचिन पायलटच्या निकटवर्तीय ललित यादव यांचा पराभव

भूपेंद्र यादव सलग दोन वेळा राज्यसभेतून खासदार म्हणून निवडून आले पण पहिल्यांदाच त्यांनी राजस्थानच्या अलवर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांनी सचिन पायलट यांचे निकटवर्तीय ललित यादव यांचा 48 हजार 334 मतांनी पराभव केला. भूपेंद्र यादव यांनी पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवून विजय मिळवला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात दुसऱ्यांदा समावेश झालेल्या भूपेंद्र यादव यांच्या महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील भाजप नेत्यांशी ते कसे ताळमेळ साधतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.