पंतप्रधान मोदींविरुद्ध कोणाला उभं करणार? उद्धव ठाकरे म्हणाले, 'आज ना उद्या...'

INDIA Alliance Meet : पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात इंडिया आघाडीचा चेहरा कोण असणार या प्रश्नावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी याबाबत भाष्य केलं आहे.

आकाश नेटके | Updated: Dec 19, 2023, 11:37 AM IST
पंतप्रधान मोदींविरुद्ध कोणाला उभं करणार? उद्धव ठाकरे म्हणाले, 'आज ना उद्या...' title=

Uddhav Thackeray : विरोधी आघाडीच्या आय.एन. डीआयए (I.N.D.I.A) बैठकीसाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे दिल्लीत पोहोचले आहेत. बैठकीच्या एक दिवस आधी यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आपचे राष्ट्रीय संयोजक आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. दुसरीकडे, सामनातून या बैठकीवरुन काँग्रेसला कानपिचक्या देण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात (PM Modi) इंडिया आघाडीचा चेहरा कोण या प्रश्नावर भाष्य केलं आहे.

"इंडिया आघाडीच्या बैठकीला हजर राहण्यासाठी दिल्लीला आलो आहे. तीन राज्यांमधील निवडणुकांच्या निकालासंदर्भात चर्चा होणार आहे. पुढच्या वर्षी एप्रिल मे पासून निवडणुका होतील. बाकीच्यांच्या सूचना काय येतील त्यावर आमचे मत मांडू. मोदींसमोर चेहऱ्याचा विषय असा तरी या आघाडीला समन्वयक ठरवता येतो का त्याचा विचार आज नाहीतर उद्या करावा लागेल. आम्ही एकत्र आलो आहोत पण आमच्या डोक्यात नेतृत्वाची हवा भरलेली नाही. आम्हाला देश वाचवायचा आहे. काही घटना पाहून देशातील लोकशाही शेवटच्या घटका मोजत आहे का हा प्रश्न आहे. लोकशाही जगली तर देश जगेल," असे उद्धव ठाकरे म्हणाले.

"अरविंद केजरीवाल नाराज नाहीत. केजरीवार आणि माझी बैठक झाली. आजच्या बैठकीच्या संदर्भात आमच्यात चर्चा झाली. नेतृत्वाबाबत उगाच तारे तोडण्यात अर्थ नाही. सगळ्यांसोबत बोलू. सगळेजण एकत्र येण्याचे कारण लोकशाही जगवण्याचे आहे. माझ्यावर जबाबदारी सोपवल्याबद्दल मी काही बोलत नाही. कारण मी सुद्धा काही सूचवणार आहे. मी हरभऱ्याच्या झाडावर चढणारा नाही. मुख्यमंत्री पद सुद्धा जवाबदारी म्हणून स्विकारली होती. त्यानंतर ते एका क्षणात सोडलं देखील होतं. माझ्यासमोर माझा देश आणि महाराष्ट्र आहे," असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

‘इंडिया’ आघाडीचा ‘चेहरा’ कोण?

याच प्रश्नावरुन सामना अग्रलेखातूनही भाष्य करण्यात आलं होतं. "तेलंगणा काँग्रेसने जिंकले ही जमेची बाजू, पण यापुढे ‘इंडिया’ आघाडी म्हणून काँग्रेसने युतीचे महत्त्व शिकायला हवे. ‘इंडिया’ आघाडीचे महत्त्व वाढवायला हवे. रथाला आज 27 घोडे आहेत, पण रथाला सारथी नाही. त्यामुळे रथ अडकून पडला आहे. ‘इंडिया’ आघाडीला संयोजक, समन्वयक, निमंत्रक जो काही असेल तो हवा आहे. अशा समन्वयकाची गरज नाही व आहे त्या परिस्थितीत ‘चालवू’ असे कुणाचे म्हणणे असेल तर ते ‘इंडिया’चे नुकसान करीत आहेत. रथाचा सारथी आता नेमावा लागेल. 19 तारखेच्या बैठकीत त्याबाबत निर्णय घेऊनच पुढचे पाऊल टाकावे लागेल. ‘इंडिया’त अनेक अनुभवी व समजदार नेत्यांचा भरणा आहे. नेतृत्वाच्या बाबतीत आम्ही वांझोटे नाही हे आघाडीतील नेते दाखवत असतात. 2024 साठी ‘इंडिया’ आघाडीचा ‘चेहरा’ कोण? याचा फैसलाही करावा लागेल. मोदींसमोर कोण? हा प्रश्न आहे. त्या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल," असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.