बायको नवऱ्याला काळ्या रंगावरुन हिणवायची; आता हायकोर्टाने दिला मोठा निर्णय

Karnataka Divorce News: पतीला त्याच्या काळ्या रंगावरुन हिणवणं हा घटस्फोटाचा आधार ठरु शकतं, असं महत्त्वपूर्ण निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Aug 8, 2023, 03:38 PM IST
बायको नवऱ्याला काळ्या रंगावरुन हिणवायची; आता हायकोर्टाने दिला मोठा निर्णय title=
Wife calling husband darkskinned amounts to cruelty highcourt grants divorce

Karnataka Divorce Viral News:  पतीला रंगावरुन हिणवणं ही क्रूरता असल्याचे महत्त्वाचे निरीक्षण कर्नाटक उच्च न्यायालयाने (High Court) नोंदवले आहे. तसं, पत्नीकडून पतीच्या काळ्या रंगावरुन टोमणे मारणे हा त्याचा अपमान करणे आहे. त्यामुळं या आधारे या जोडप्यांच्या घटस्फोटाला (Divorced) मंजुरी मिळू शकते, अशी टिप्पणी करत उच्च न्यायालयाने एका जोडप्याच्या घटस्फोटाला मंजूरी दिली आहे. (Wife Insulting Husband Over Dark Skinned)

उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अलोक अराधे आणि अनंत रामनाथ हेगडे यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे. निकाल देताना कोर्टाने म्हटलं आहे की, रेकॉर्डवर उपलब्ध असलेल्या सर्व साक्षी-पुराव्यांचा अभ्यास केल्यानंतर कोर्ट या निष्कर्षापर्यंत पोहोचली आहे की, पत्नी पतीच्या काळ्या रंगावरुन त्याचा सतत अपमान करत होती आणि त्यामुळंच दुसरं काहीही कारण नसताना ती त्याच्यापासून वेगळं राहत होती. त्यामुळंच त्यांच्या घटस्फोटाला मंजुरी देण्यात येत आहे, अशा निर्णय कोर्टाने दिला आहे. 

काय आहे प्रकरण? 

घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज केलेल्या जोडप्याचे 2007 साली लग्न झाले होते. त्या दोघांना एक मुलगीदेखील आहे. पतीने 2012मध्ये घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, 2017 साली कौटुंबिक न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला होता. त्यानंतर पतीने पुन्हा हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले होते. हायकोर्टाने सर्व साक्षी-पुराव्यांचा अभ्यास केल्यानंतर त्यांचा घटस्फोट मंजुर केला आहे. 

पत्नी सातत्याने पतीच्या काळ्या रंगावरुन तिचा अपमान करायची. मात्र पतीने मुलीच्या प्रेमाखातर वेळोवेळी अपमान सहन केला. त्यानंतर महिलेने पती आणि सासू-सासऱ्यांच्याविरोधात आयपीसी कलमअंतर्गंत 498 एअंतर्गंत तक्रार दाखल केली. त्याचबरोबर घरगुती हिंसाचाराचा आरोपही केला. व आपल्या मुलीला घेऊन तिच्या माहेरी राहू लागली. 

कोर्टाने काय म्हटलं?

पतीने हायकोर्टात धाव घेतल्यानंतर त्याने पत्नीच्या वागणुकीबाबतही सविस्तर पुरावे मांडले. मात्र, त्यावर महिलेने पतीचे अनैतिक संबंध असल्यामुळं त्याचा घटस्फोट हवा असा खोटा आरोप केला होता. मात्र, हायकोर्टाने पत्नीचे आरोप फेटाळून लावले आहे. तसंच, महिलेनेच पती व सासरच्या लोकांविरोधात गैरव्यवहार केल्याचं कोर्टाने म्हटलं आहे. पतीच्या काळ्या रंगावरुन हिणवणे ही क्रूरता असल्याची महत्त्वपूर्ण टिप्पणी कोर्टाने नोंदवली आहे. त्याआधारे हायकोर्टाने हिंदू मॅरेज अॅक्टची कलम 13 (i) (a) अंतर्गंत त्यांच्या घटस्फोटाला मंजुरी दिली आहे.