CM च्या राजीनाम्याची मागणी ऐकताच चंद्रचूड संतापून म्हणाले, 'मला तुम्हाला कोर्टाच्या बाहेर...'

CJI Chandrachud Agnry On Lawyer: सर्वोच्च न्यायालयाने स्वत: सदर प्रकरणाची दखल घेत याचिका दाखल करुन घेतली असून याच संदर्भातील सुनावणीदरम्यान हा प्रकार घडला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 18, 2024, 11:19 AM IST
CM च्या राजीनाम्याची मागणी ऐकताच चंद्रचूड संतापून म्हणाले, 'मला तुम्हाला कोर्टाच्या बाहेर...' title=
मंगळवारी सुनावणीदरम्यान घडला हा प्रकार

CJI Chandrachud Agnry On Lawyer: भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड मंगळवारी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणीदरम्यान चिडल्याचं पाहयला मिळालं. एका वरिष्ठ वकिलाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींसंदर्भात केलेली एक मागणी ऐकून सरन्यायाधीश चंद्रचूड चांगलेच खवळले. आर. जी. कर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयामध्ये 9 ऑगस्ट रोजी प्रशिक्षक महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान हा प्रकार घडला. संतापलेल्या चंद्रचूड यांनी या वकिलाला थेट न्यायालयाबाहेर काढण्याचा इशाराच दिला. असं नक्की घडलं तरी काय जे जाणून घेऊयात.

नेमकी काय मागणी करण्यात आली?

आर. जी. कर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयामध्ये झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सुमोटो म्हणजेच स्वत:हून याचिका दाखल करत सुनावणी हाती घेतली आहे. याच प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान संपूर्ण देशाला हादरवून सोडणारं हे बलात्कार प्रकरण हाताळण्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना अपयश आल्याचा दावा करत या वकिलाने न्यायालयाने त्यांना पद सोडण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी केली. खरं तर मंगळवारच्या सुनावणीमध्ये बरेच वादविवाद झाल्यानंतर दिवसभरातील कामकाज संपत असतानाच या वकिलाने अर्जाद्वारे ममता बॅनर्जींना राजीनामा देण्याचे निर्देश न्यायालायने द्यावेत अशी याचिका सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय खंडपिठासमोर सादर केली. मात्र हा अर्ज हातात पडताच सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सदर याचिकेमागील राजकीय हेतूचा संदर्भ अधोरेखित करत नाराजी व्यक्त केली.

आम्ही काय बोलावं हे तुम्ही सांगण्याची गरज नाही

ममतांच्या राजीनाम्याच्या निर्देशासंदर्भातील अर्जावर बोलताना सरन्यायाधीशांनी, "एक सेकंद थांबा, तुम्ही कोणच्या बाजूने लढत आहात? हा काही राजकीय मंच नाही. तुम्ही बारचे (बार काऊन्सिलचे) सदस्य आहात. आम्ही काय बोलावं यासाठी आम्हाला तुमच्या परवानगीची गरज नाही. कृपया आमंच ऐखून घ्या. तुम्ही जी काही मागणी कराल ती कायद्याच्या चौकटीत बसणारी असावी. तुम्हाला किंवा इतरांना राजकीय घडामोडींबद्दल काय वाटतं हे ऐकून घेण्यासाठी आम्ही इथे बसलेलो नाही. तो तुमचा प्रश्न आहे," असं स्पष्ट शब्दांमध्ये या वकिलाला सांगितलं. 

नक्की वाचा >> Kolkata Rape Case: सिब्बल यांची Live Streaming थांबवण्याची मागणी; चंद्रचूड म्हणाले, 'कोणत्याही...'

मी मुख्यमंत्र्यांना राजीनाम्याचा आदेश द्यावा असं वाटत असेल तर...

तसेच सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी न्यायालय सध्या कोलकात्यामध्ये आंदोलन करत असलेल्या कनिष्ठ डॉक्टरांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी उत्सुक असल्याचंही म्हटलं. "तुम्ही मला सांगत असाल की मी मुख्यमंत्र्यांना राजीनामा देण्याचा आदेश द्यावा तर तो माझ्या कामाचा भाग नाही," असं सडेतोड उत्तर चंद्रचूड यांनी ममतांच्या राजीनाम्यासंदर्भातील निर्देशाची मागणी करणाऱ्या वकिलाला दिलं.

...तर तुम्हाला कोर्टाबाहेर काढावं लागेल

एवढं समजावून सांगितल्यानंतरही या वकिलाने ममतांच्या राजीनाम्यासंदर्भातील याचिका रेटण्याचा प्रयत्न केला असता सरन्यायाधीशांनी संतापून, "एक सेकंद थांबा. आधी माझं ऐखून घ्या नाहीतर मला तुम्हाला न्यायालयातून बाहेर काढावं लागेल," असा इशाराच या वकिलाला दिला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ZEE 24 TAAS (@zee24taas)

डॉक्टरांना नकोय राजीनामा

आंदोलनकर्त्या पश्चिम बंगाल कनिष्ट डॉक्टरांच्या फोरमने आम्हाला या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा राजीनामा नको असून केवळ आमचं पाच मुद्द्यांमधील मागण्या मान्य कराव्यात असं असल्याचं आधीच स्पष्ट केलं आहे.