Corona Virus Update: देशात कोरोनाची प्रकरणं वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढलीये. राजधानी दिल्लीत नव्या सब-व्हेरिएंटचा रूग्ण सापडल्याने आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आहे. भारतात गेल्या 24 तासांमध्ये 529 रूग्ण सापडले आहेत. दरम्यान पुन्हा एकदा कोरोनाची वाढती रूग्णसंख्या पाहता औषध कंपन्या नवीन प्रकारांवर लस बनवण्यात रस दाखवत आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाची कोविशील्ड लस तयार करणारी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया जेएन.१ या नवीन सब व्हेरिएंट विरूद्ध लस तयार करण्यासाठी सरकारकडे अर्ज करू शकते. सीरम इन्स्टिट्यूटने स्वतः कोविड प्रकार xbb.1 विरुद्ध लस तयार केली होती. लस संशोधकांच्या मते, लोकांना सध्या बूस्टर डोस घेण्याची गरज नाही.
AIIMS दिल्ली आणि AIIMS गोरखपूर यांनी मिळून लोकांमधील कोरोना विरूद्ध एंटीबॉडीजची तपासणी केलीये. यावेळी तज्ज्ञांना संशोधनात असं आढळून आलंय की, ज्या लोकांना लसीचे दोन डोस मिळालेत किंवा ज्यांना कधी कोरोना व्हायरसची लागण झालीये त्यांच्याकडे सध्या पुरेश्या प्रमाणात अँटीबॉडीज आहेत. त्यामुळे नव्या व्हेरिएंटमुळे या लोकांनी घाबरू नये.
भारतात, कोरोना व्हायरस JN.1 च्या नवीन सब व्हेरिएंटच्या रूग्णांची संख्या वाढतेय. यावेळी नवीन व्हेरिएंटची सर्वाधिक प्रकरणं गुजरातमध्ये आढळून आली आहेत. या ठिकाणी 36 रुग्णांची पुष्टी झालीये. याशिवाय गुजरातमध्ये एकूण एक्टिव्ह रुग्णांची संख्या 59 आहे. कर्नाटकात JN.1 चे एकूण 34 रुग्ण आढळले असून एकूण कोरोना रुग्णांची संख्या 409 आहे.
महत्त्वाचं म्हणजे गेल्या 24 तासांत 3 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. तिघांपैकी एक गुजरात आणि दोन कर्नाटकात नोंद करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 4093 आहे.
दिल्लीत कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या तीन नमुन्यांच्या जीनोम सिक्वेन्सिंगची नोंद करण्यात आली आहे, ज्यामध्ये एका नमुन्यात सब-व्हेरियंट जेएन-1 च्या संसर्गाची पुष्टी करण्यात आली. याशिवाय दोन नमुन्यांमध्ये ओमिक्रॉनच्या जुन्या व्हेरिएंटचा संसर्ग आढळून आलाय.