शरद पवारांशिवाय मोदींसमोर सक्षम पर्याय नाही, संजय राऊत यांचं वक्तव्य

'शरद पवार यांनी विरोधकांच्या एकजुटीसाठी पुढे यावं'

Updated: Apr 4, 2022, 10:12 AM IST
शरद पवारांशिवाय मोदींसमोर सक्षम पर्याय नाही, संजय राऊत यांचं वक्तव्य title=

नवी दिल्ली : 'यूपीएचा (UPA) अध्यक्ष बनण्यात मला जराही रस नाही, असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी यासंदर्भातील सर्व चर्चांना पूर्णविराम दिला असतानाच आता पुन्हा एका शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यासंदर्भात वक्तव्य केलं आहे. 

शरद पवार यांच्या पुढाकाराशिवाय या देशात मोदींना पर्याय निर्माण होऊ शकत नाही, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.  शरद पवार खुप मोठे नेते आहेत. आम्ही सर्वच त्यांचा आदर करतो, सन्मान करतो, देशातील विरोधी पक्षाला एक सक्षम नेतृत्वाची गरज आहे. देशातील विरोधी पक्ष एकत्र यावा, समविचारी पक्ष एकत्र यावा यासाठी नक्कीच काही हालचाली ठरतायत. शरद पवार यांच्या सक्रिय सहभागाशिवाय या एकजुटीचं पाऊल पुढे जाणार नाही, संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

शरद पवार यांच्या पुढाकाराशिवाय या देशात मोदींना पर्याय निर्माण होऊ शकत नाही. देशामध्ये अनेक नेते आहेत, जे सक्षम आहेत, पण त्यासाठी पुढाकार घेण्यासाठी शरद पवारांसारख्या नेत्याने पुढे यावं अशी आमची भूमिका आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

शरद पवार यांनी काय म्हटलं होतं?
युपीएच्या अध्यक्षपदासाठी शरद पवार यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसनेही तसा ठरवा केला आहे. पण स्वत: शरद पवार यांनी मात्र या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मी यूपीए अध्यक्ष बनावं असा ठराव आमच्या तरुणांनी केली. पण मला यात जराही रस नाही, पण एकत्र येऊन जर पर्याय देण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्यांना सहकार्य आणि पाठिंबा देण्याची माझी तयारी आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.