मुंबई : बंगळुरूहून मुंबईला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाचा प्रवास नक्कीच खास होता. मंगळवारी सकाळी जेव्हा विमान मुंबईत उतरणार होतं... तेव्हा निश्चित वेळेपेक्षा विमानाला उतरण्यासाठी थोडा वेळ लागेल हा संदेश देतानाच कॅप्टन परेश नेरुरकर यांनी आणखीन एक संदेश दिला... आणि या संदेशानं उपस्थित प्रवाशांसहीत फ्लाईट स्टाफचेही डोळे आनंदाश्रुंनी वाहू लागले.
विमानातल्या सर्वात सिनिअर एअरहोस्टेस असलेल्या पूजा चिंचानकर तब्बल ३८ वर्षांनंतर आज फ्लाईट लॅन्डिंगसोबत निवृत्त होत असल्याची घोषणा त्यांनी केली... परंतु, उल्लेखनीय म्हणजे याच फ्लाईटमध्ये पूजा यांची मुलगी को-पायलट म्हणून उपस्थित होती...
पूजा चिंचानकर यांचा वारसा त्यांची मुलगी अश्रिता पुढे घेऊन जाईल, अश्रिता सध्या याच फ्लाईटच्या कॉकपिट ए-३१९ मुंबईमध्ये को - पायलट म्हणून उपस्थित आहेत, असंही नेरुरकर यांनी म्हटलं... तेव्हा विमानात उपस्थित असलेल्या प्रवाशांनी टाळ्यांच्या कडकडाटासह पूजा यांना निरोप दिला. मुंबई एअरपोर्टवर विमान दाखल झाल्यानंतर पूजा यांनी हसतमुखानं प्रवाशांना निरोप दिला.
पूजा आणि अश्रिता यांना एअरइंडियानंही आपल्या ट्विटर हॅन्डलच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्यात. हा क्षण माझ्यासाठी अत्यंत अभिमान आणि आनंदाचा होता, असं अश्रितानं म्हटलंय.
#FlyAI : @caramelwings Our heartfelt wishes to your mother and you for this special flight when she passes the baton on to you to have the privilege of serving our passengers with dedication. The legacy lives on. https://t.co/AxJiFllPbv
— Air India (@airindiain) July 31, 2018
मी १९८० मध्ये एअरइंडियाच्या कुटुंबाचा भाग बनले तेव्हा केवळ दोन महिला पायलट होत्या. आज माझी मुलगी पायलट आहे याचा मला अत्यानंद होतोय, असं म्हणत पूजा यांनी आपल्या सहकाऱ्यांचा निरोप घेतलाय.