Video Viral : पोलीस की सैतान, 'या' किरकोळ कारणावरून वृद्धावर पाडला काठ्यांचा पाऊस

Bihar Crime : या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. महिला पोलिसांनी त्या वृद्ध व्यक्तीवर काठ्यांचा पाऊस पाडला पोलिसांनीही या प्रकरणाची दखल घेऊन या दोषींना सोडले जाणार आहे असे म्हटले आहे.  

Updated: Jan 21, 2023, 06:00 PM IST
Video Viral : पोलीस की सैतान, 'या' किरकोळ कारणावरून वृद्धावर पाडला काठ्यांचा पाऊस title=

Women Cops Beat Old Man : बिहारच्या (Bihar) कैमूरमधून (Kaimur) पोलिसांच्या अमानुष कृत्याचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. महिला पोलिसांच्या (Police) कृत्याचा हा व्हिडीओ पाहून सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले आहे. सोशल मीडियावर (Social Media) हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दोन महिला पोलिसांनी एका वृद्ध व्यक्तीला जबर मारहाण केल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. महिला पोलिसांनी त्या वृद्ध व्यक्तीवर काठ्यांचा पाऊस पाडला. वृद्धाला मारहाण होताना पाहून कोणीही मध्यस्थी केली नसल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

कैमूरच्या भाबुआ शहरात शुक्रवारी हा सर्व प्रकार घडल्याचे समोर आले आहे. मारहाण झालेल्या वृद्ध व्यक्तीचे नाव नवल किशोर पांडे असून ते एका खासगी शाळेत शिक्षकाचे काम करतात. शाळेतून शिकवून घरी परतत असताना दोन महिला पोलिसांनी त्यांना मारहाण केली. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक झाल्यानंतर महिला पोलीस हवालादारांनी नवल पांडे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनीही हा व्हिडीओ ट्वीटरवर पोस्ट केला आहे. "कैमूर जिल्ह्यातील एका खाजगी शाळेत शिकवणाऱ्या या वृद्धाचा दोष एवढाच होता की तो सायकलवरून पडला आणि उठायला थोडा वेळ लागला. हे नितीशजींच्या अधिकाऱ्यांचे जंगलराज आहे. चोर आणि उच्चपदस्थ लोक राज्य करत आहेत आणि लोकांवर लाठीचार्ज केला जात आहे," असे प्रशांत किशोर यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

 

नेमकं काय घडलं?

गेल्या 40 वर्षांपासून नवल किशोर पांडे मुलांना शिकवत आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, वयोवृद्ध शिक्षक नवल किशोर पांडे हे नेहमीप्रमाणे मुलांना शाळेतून शिकवून सायकलवरून घरी जात असताना भभुआ शहरातील एकता चौकाजवळ त्यांची सायकल पडली. भभुआ पोलीस ठाण्यातील तिथे तैनात असलेल्या 2 महिला हवालदार त्यांच्याकडे गेल्या आणि त्यांना त्यांची सायकल काढण्यास सांगितले. मात्र नवल किशोर पांडे यांना सायकल काढण्यास उशीर होऊ लागल्याने संतप्त महिला हवालदारांनी काहीही न बोलता पांडे यांना काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली.

दरम्यान, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस उपायुक्तांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. या घटनेचा तपास केला जात आहे. दोषींना सोडले जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.