नातेवाईकांनी होकार दिला नाही, अखेर एकट्या महिला तहसिलदाराकडून अंत्यसंस्कार

येथे जवळपास 5 तासांपर्यंत एक मृतदेह घराबाहेर पडून होता, परंतु आजूबाजूचे कोणीही त्या मृतदेहाला उचलण्यासाठी पुढे आले नाही.

Updated: May 11, 2021, 09:50 PM IST
नातेवाईकांनी होकार दिला नाही, अखेर एकट्या महिला तहसिलदाराकडून अंत्यसंस्कार title=

जयपूर  : कोरोनामुळे देशात असा कहर केला की, यामुळे केवळ माणसचं नाही तर, त्यामुळे माणसाची माणुसकीही मरत चालली आहे. या संसर्गामुळे, लोकं एकमेकांपासून शरीरानेच नाही तर, मनानेही दूर गेली आहेत. अशावेळी जर एखाद्या व्यक्तिचा इतर कोणत्या आजाराने मृत्यू झाला, तरी लोकं त्या व्यक्तीला कोरोना संसर्गामुळेच मृत्यू झाला अशा संशयाने पाहातात. अशीच एक घटना राजस्थानच्या सीकरमधील धोद गावात घडली आहे.

येथे जवळपास 5 तासांपर्यंत एक मृतदेह घराबाहेर पडून होता, परंतु आजूबाजूचे कोणीही त्या मृतदेहाला उचलण्यासाठी पुढे आले नाही. त्या मृत महिलेचा नवरा सर्व लोकांकडून मदतीसाठी विचारत होता. लोकं निःशब्द होऊन सगळं पाहात होते, परंतु कोणीही पुढे आले नाही. या सगळ्या घटनेची माहिती मिळताच एक महिला तहसीलदार तेथे आल्या आणि त्यांनी स्वत: त्या मृतदेहाला स्मशानभूमीत नेले.

धोद गावच्या प्रभाग १ मध्ये राहणार्‍या सायर कंवर या महिलेचा खासगी रुग्णालयात आजारपणामुळे मृत्यू झाला. दुपारी बाराच्या सुमारास महिलेचा मृतदेह घराबाहेर ठेऊन रुग्णवाहिका निघाली. श्योबख्श सिंग त्याच्या लहान नातवंडांसोबत आजूबाजूच्या लोकांकडून आपल्या पत्नीचा मृतदेह स्मशानभूमीत नेण्यासाठी विनवणी करत होता, परंतु कोणीही त्यांच्या मदतीसाठी पुढे आले नाही.

रुग्णवाहिकासुद्धा मदतीसाठी आली नाही

या प्रकरणाची माहिती गावचे सरपंच अमरसिंह यांना समजताच त्यांनी तहसीलदार रजनी यादव यांना तातडीने माहिती दिली. माहिती मिळताच तहसीलदार रजनी यादव घटनास्थळी पोहोचल्या असता त्यांनी पाहिले की, कोणतीही व्यक्ती त्या महिलेला हात लावण्यास तयार नाही. बरीच वाट पाहिल्यानंतर तहसीलदारांनी बीसीएमएचओ जगदीश यांच्याशी बोलून रुग्णवाहिकेची मदत मागितली, पण बीसीएमएचओने अँम्ब्युलन्सवाल्यांशी तहसीलदारांनाच बोलण्यास सांगितले.

तहसीलदार यांनी प्रभारी अँम्ब्युलन्सकडे मदत मागितली असता ते म्हणाले की, आजारी लोकांसाठी रुग्णवाहिका दिली जाते, मृत व्यक्तींसाठी रुग्णवाहिका दिली जाणार नाही. यानंतर तहसीलदार आणि सरपंचांनी एकत्र पिकअपची व्यवस्था केली. सुरक्षा लक्षात घेऊन तहसीलदारांनी चार पीपीई कीट मागवल्या आणि स्वत: किट घालून त्या महिलेचा मृतदेह स्मशानभूमीत आणला.