World Cup losing shock: वर्ल्ड कप 2023 मध्ये टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाने पराभव केला. यानंतर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिममधले 1 लाख 30 हजारांची प्रेक्षक संख्या अक्षरश: शांत झाली. देशातील लाखो क्रिकेट चाहत्यांसाठी हा मोठा धक्का होता. केवळ टीम इंडियाचेच नाही तर संपूर्ण भारताचे वर्ल्ड कपचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंनाही आपले अश्रू आवरणे कठीण झाले होते. मात्र विश्वचषक गमावल्यामुळे काही लोकांना इतका धक्का बसला की, देशातील दोन जणांनी आपले आयुष्य संपवले आहे.
भारत हा क्रिकेटप्रेमींचा देश आहे. येथे क्रिकेटला धर्म मानले जाते आणि क्रिकेटर्सना देव म्हणून पुजले जाते. अशावेळी एखाद्या घटनेने अपेक्षाभंग झाल्यास चाहत्यांसाठी मोठा धक्का असतो. याचीच प्रचिती 2 घटनांमधून आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर बांकुरा, पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या जाजपूरमध्ये दोघांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
राहुल लोहार (23) नावाच्या तरुणाने रविवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केली. बांकुरा येथील बेलियाटोर पोलीस स्टेशन हद्दीतील सिनेमा हॉलजवळ त्याने आपल्या आयुष्याचा अखेर केला. राहुल हा परिसरातील एका कपड्याच्या दुकानात काम करायचा. भारत आणि ऑस्ट्रेलियातील वर्ल्ड कप फायनलचा सामना पाहण्यासाठी त्याने रविवारी सुट्टी घेतली होती, असे राहुलचे नातेवाईक उत्तम सूर यांनी सांगितले.
ऑस्ट्रेलियाकडून भारताच्या पराभवामुळे दु:खी झालेल्या राहुलने टोकाचा निर्णय घेत आपल्या खोलीत गळफास लावून घेतला, असे सुरने सांगितले. दरम्यान राहुलचा मृतदेह सोमवारी सकाळी पोस्टमॉर्टमसाठी बांकुरा संमिलानी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला आणि अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
वर्ल्ड कप 2023 टीम इंडियाने हारल्यानंतर ओडिशाच्या जाजपूरमधूनदेखील धक्कादायक घटना समोर आली. देव रंजन दास नावाच्या 23 वर्षीय व्यक्तीला टीम इंडियाची हार पचवणे कठीण झाले होते. त्याने रविवारी रात्री सामना संपल्यानंतर लगेचच बिंझारपूर भागात गळफास घेतला. स्वत:च्या घरात लटकलेल्या अवस्थेत सापडला.
देव रंजन दास हा भावनिक विकार ग्रस्त होता आणि त्याच्यावर उपचार सुरू होते, असे दासच्या एका नातेवाईकाने सांगितले. भारत सामना हरल्यानंतर दास खूप निराश झाला होता, असेही ते पुढे म्हणाले. या घटनेप्रकरणी आम्ही अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे आणि पोस्टमॉर्टम अहवालाची वाट पाहत आहोत, असे झरी चौकीचे प्रभारी इंद्रमणी जुआंगा यांनी सांगितले.