Wrestlers Protest Video : आधी पळ काढला, मग माईक झटकला; कुस्तीपटूंच्या प्रश्नाला झुगारून मीनाक्षी लेखी निघाल्या करी कुठे?

Wrestlers Protest : क्रिकेटपटूंची वाहवा सुरु असतानाच तिथे कुस्तीपटूंवर मात्र सलग कारवायांचा बडगा उगारला जात आहे. न्यायासाठी रस्त्यावर उतरलेल्या या कुस्तीपटूंची दखल कोण घेणार?   

सायली पाटील | Updated: May 31, 2023, 07:44 AM IST
Wrestlers Protest Video : आधी पळ काढला, मग माईक झटकला; कुस्तीपटूंच्या प्रश्नाला झुगारून मीनाक्षी लेखी निघाल्या करी कुठे?  title=
Wrestlers Protest question troubles central minister Meenakshi Lekhi watch video

Wrestlers Protest : भारतीय क्रीडा जगतामध्ये सध्या प्रचंड तफावतीचं चित्र पाहायला मिळत आहे. एकिकडे (IPL 2023 Finals) आयपीएलची धूम, क्रिकेटपटूंची वाहवा आणि त्यांना अमाप प्रेम मिळत असताना दुसरीकडे देशासाछी पदकं जिंकणारे कुस्तीपटू मात्र पाठिंब्यासाठी सर्वांकडेच आसुसलेल्या नजरेनं पाहत आहेत. न्याय मिळवण्यासाठी सुरु असणारं त्यांचं आंदोलन अद्यापही निकाली निघालेलं नाही. किंबहुना परिस्थिती इतकी गंभीर वळणावर आली की, या कुस्तीपटूंनी पदकं (Ganges) गंगेत विसर्जित करण्याता निर्णय घेतला होता. 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी आमची मागणी ऐकली नाही तर आम्ही पदकं गंगेत विसर्जित करू असा इशारा देत कुस्तीपटूंनी ट्विट केलं. ज्यानंतर कुस्तीपटूंच्या या निर्णयाचा गंगासभेकडून विरोध करण्यात आला. नागरिकांच्या पूजाअर्चेच्या या ठिकाणी सुरु असणाऱ्या घडामोडी पाहता हे जंतरमंतर किंवा कोणतं राजकीय मैदान नाही असं म्हणत त्यांना पदकं विसर्जित न करण्याचं आवाहन केलं. 

सत्ताधारी काढतायत पळ.... 

भारतीय कुस्ती संघाचे (WFI) प्रमुख बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांच्याविरोधात कुस्तीपटूंनी आंदोलन पुकारलेलं असतानाच त्यामध्ये लैंगिक शोषणाचे आरोपही सिंह यांच्यावर केले जात आहेत. पण, सत्ताधाऱ्यांकडून मात्र या प्रश्नाला बगल दिली जात आहे. अद्यापही सत्ताधारी भाजपकडून कोणत्याही नेत्यानं या आंदोलनाची दखल घेतलेली नाही. इतकंच काय, तर या संबंधीचा प्रश्न विचारताच केंद्रीय मंत्री (Meenakshi Lekhi) मीनाक्षी लेखी यांनी तर चक्क पळच काढला. 

व्हायरल होतोय व्हिडीओ 

काँग्रेसच्या (Congress) अधिकृत ट्विटर हँडलवरून लेखी यांचा एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये त्या चक्क आपल्या वाहनाच्या दिशेनं पळताना दिसत आहे. तितक्यातच माध्यमांच्या एक प्रतिनिधी त्यांना कुस्तीपटूंच्या आंदोलनाबाबतचा प्रश्न विचारतात तेव्हा, 'चलो चलो चलो...' असं म्हणत त्या पटापट पुढे निघताना दिसतात. प्रश्नांचा मारा थांबत नसल्याचं पाहून 'कायदेशीर प्रक्रिया सुरु आहे' इतकंच म्हणून त्या कारपाशी जातात आणि तिथे माईक झटकतात. 

केंद्रीय मंत्री आणि त्याहूनही एक महिला मंत्री असताना इतक्या संवेदनशील विषयावर लेखी यांची ही प्रतिक्रिया पाहता सध्या त्यांच्याविरोधात अनेकांनीच नाराजीचा सूर आळवला आहे. सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडीओही व्हायरल होत असून, मंत्रीमहोदयांच्या कार्यपद्धतीवरच नागरिकांनी सवाल उपस्थित केला आहे.