'झी मीडिया'कडून भविष्यातील पत्रकारांचा शोध, माध्यमात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी मोठी संधी

प्रशिक्षण कार्यक्रम एकूण नऊ महिन्यांचा असेल आणि त्याची सुरुवात एप्रिल/मे २०१९ पासून होईल.

Updated: Dec 28, 2018, 05:43 PM IST
'झी मीडिया'कडून भविष्यातील पत्रकारांचा शोध, माध्यमात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी मोठी संधी title=

नवी दिल्ली -  एस्सेल समुहातील आणि देशातील सर्वांत मोठे न्यूज नेटवर्क असलेल्या 'झी मीडिया'कडून देशस्तरावर भविष्यातील पत्रकारांचा शोध घेण्यासाठी कृतीबद्ध कार्यक्रम सुरू करण्यात येत आहे. अत्यंत काटेकोरपणे आखण्यात आलेल्या या कार्यक्रमात वेगवेगळ्या निवड चाचण्यांमधून सुयोग्य विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. त्यासाठी पुढील प्रक्रियेचा अवलंब करण्यात येईल.

१. झी ऍप्टिट्यूड टेस्टच्या (कल चाचणी) माध्यमातून देशपातळीवर सर्वांत आधी लेखी परीक्षा घेतली जाईल. (निवड टप्पा १)

२. विद्यार्थ्यांना नेमून दिलेले काम सादर करणे (निवड टप्पा २)

३. संपादकीय आणि मनुष्यबळ विकास विभागासोबत मुलाखत (निवड टप्पा ३)

तिन टप्प्यांतून निवडलेल्या विद्यार्थ्यांना बहुभाषिक आणि बहुमाध्यम पत्रकारितेतील कौशल्ये, त्यासाठीचे तंत्रज्ञान शिकवले जाईल. यामध्ये मोबाईल जर्नालिझम आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स यांचाही समावेश असेल.

प्रशिक्षण कार्यक्रमासाठी निवड झाल्यावर विद्यार्थ्यांना झी मीडियाकडून पहिल्याच दिवशी नोकरीचे पत्र (जॉब ऑफर) दिले जाईल. (प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण करणे यासाठी अनिवार्य असेल)

प्रशिक्षण कार्यक्रम एकूण नऊ महिन्यांचा असेल आणि त्याची सुरुवात एप्रिल/मे २०१९ पासून होईल. 'झी इन्स्टिट्यूट ऑफ मीडिया आर्ट्स'कडून या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना १.५ लाख रुपये अधिक जीएसटी इतके शुल्क भरावे लागेल.

प्रशिक्षण कार्यक्रमात तीन महिन्यांच्या इंटर्नशीपचाही समावेश आहे. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रतिमहिना १० हजार रुपयांची पाठ्यवृत्ती (स्टायपेंड) दिली जाईल.

संपूर्ण निवड प्रक्रियेची पहिली फेरी म्हणजे झी ऍप्टिट्यूड टेस्ट (प्रवेश परीक्षा) असून, ती रविवारी, २७ जानेवारी २०१९ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत घेण्यात येईल. या परीक्षेमध्ये सामान्य ज्ञानावर आधारित बहुपर्यायी प्रश्न तसेच दीर्घ उत्तरांचे काही प्रश्नही असतील. 

देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये ही परीक्षा एकाचवेळी घेतली जाईल. यामध्ये अगरतळा, अहमदाबाद, ऐझवाल, अमृतसर, हैदराबाद, भटिंडा, भोपाळ, चंदीगढ, चेन्नई, गंगटोक, गुवाहाटी, ग्वाल्हेर, हरिद्वार, हिसार, इम्फाळ, इंदूर, इटानगर, कानपूर, कोहिमा, कोट्टायम, लखनऊ, लुधियाना, मेरठ, मुंबई, नाशिक, नवी दिल्ली, नोएडा, पणजी, पतियाळा, प्रयागराज, पुणे, शिलाँग, श्रीनगर, वाराणसी, विशाखापट्टणम या शहरांचा समावेश आहे. विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा ५० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झालेले विद्यार्थीच या प्रवेश परीक्षेला बसू शकतात. पदवी परीक्षेच्या शेवटच्या वर्षात प्रवेश घेतलेले आणि पदवी परीक्षेचा निकाल न लागलेले विद्यार्थीही या प्रवेश परीक्षेस बसण्यास पात्र आहेत.

प्रवेश परीक्षेसाठीचे शुल्क रुपये १००० असून, विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरावयाचे आहेत. ऑनलाईन अर्ज पुढील लिंकवर उपलब्ध आहेत. www.zimainstitute.com/zat-registration.aspx

एस्सेल ग्रुपच्या इनोव्हेशन विभागाचे प्रमुख आणि 'सिटी नेटवर्क'चे कार्यकारी संचालक सिद्धार्थ बाळकृष्ण यांच्या पुढाकारातून हा संपूर्ण कार्यक्रम आखण्यात आला आहे. ते म्हणाले, शिस्तबद्ध कार्यक्रमाच्या माध्यमातून निवड करून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना सेवेत सामावून घेण्यासाठी एस्सेल समुहातील दोन कंपन्या एकत्र येत आहेत, याबद्दल मला आनंद वाटतो. माध्यमात काम करण्यास इच्छुक असणाऱ्या देशाच्या विविध भागातील विद्यार्थ्यांना संधी देण्यासाठी हा कार्यक्रम महत्त्वाचा ठरणार आहे. या कार्यक्रमाची प्रेरणा आम्हाला समुहाच्या अध्यक्षांकडून मिळाली असून, ते कायमच आम्हाला प्रेरणा देत असतात आणि मोठे स्वप्न बघण्यास प्रवृत्त करत असतात. 

'झी लर्न'चे मुख्य कार्यकारी अधिकारी देवशंकर मुखोपाध्याय म्हणाले, झी इन्स्टिट्यूट ऑफ मीडिया आर्ट्स आणि झी मीडिया कॉर्पोरेशन लिमिटेड या दोन्ही कंपन्यांनी मिळून संयुक्तपणे तयार केलेला हा कार्यक्रम पत्रकारिता शिक्षणाच्या क्षेत्रातील आदर्श ठरेल. ज्यांना पत्रकारितेमध्ये आपले करिअर करायचे आहे. त्यांच्यासाठी ही मोठी संधी असेल. यामध्ये त्यांना आवश्यक कौशल्ये शिकता येतील आणि नव्या रुपातील पत्रकारितेचे तंत्रही आत्मसात करता येईल.

झी मीडियाचे मुख्य मनुष्यबळ विकास अधिकारी सुशील जोशी म्हणाले, झी ऍप्टिट्युड टेस्ट हा झी मीडिया आणि 'डीएनए'चा राष्ट्रीय स्तरावरील टॅलेंट सर्च कार्यक्रम आहे. या माध्यमातून बहुमाध्यम आणि बहुभाषिक पत्रकारितेच्या (टेलिव्हिजन, वृत्तपत्रे आणि डिजिटल या तिन्ही माध्यमात काम करू शकणारे) क्षेत्रात काम करण्यास इच्छुक असणाऱ्या सर्जनशील पदवीधरांचा शोध घेण्यात येईल. विविध भागातील विद्यार्थ्यांसाठी देशातील एका मोठ्या माध्यम संस्थेत काम करण्याची आणि स्वतःचे करिअर घडवण्याची ही एक संधी आहे.

अधिक माहितीसाठी लॉग इन करा - www.zimainstitute.com/zat-registration.aspx