ठाणे: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेल्या लंडनमधील घराचे स्मारकार रुपांतर झाले आहे. मात्र, या स्मारकाला भेट देणे प्रत्येकालाच शक्य होणार नाही. त्यामुळे राज्य सरकारने आंबेडकर यांचे बालपण गेलेल्या वरळी येथील बीडीडी चाळीचे स्मारकार रुपांतर करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बालपण वरळीमध्ये गेले आहे. त्यांनी आपल्या आयुष्यातील २२ वर्षे वरळीमधील बीडीडी चाळीत काढली. या चाळीतील त्यांची खोली अजूनही तशीच आहे. याच खोलीमध्ये शाहू महाराज त्यांना भेटायला आले होते. त्यावेळी बाबासाहेबांची हुशारी आणि विद्वत्ता पाहून त्यांना शिकण्यासाठी परदेशात पाठवले होते. त्यामुळे या खोलीसह संपूर्ण इमारतीचे स्मारकात रुपांतर करावे. जेणेकरून गोरगरिबांना या स्मारकाला भेट देता येईल, असे जितेंद्र आव्हाड यांचे म्हणणे आहे. या स्मारकात वर्णद्वेष, जातीद्वेष आणि धर्मद्वेष याच्याविरोधात काम केलेल्या जगातील नेत्यांचा समावेश करता येईल, असेही आव्हाड यांनी सुचविले.