मनोहर पर्रिकर अमेरिकेहून परतले; नेतृत्वबदलाच्या अफवांना पूर्णविराम

या अस्थिरतेमुळे गोव्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेचे जोरदार वारे वाहत होते.

Updated: Sep 6, 2018, 09:04 PM IST
मनोहर पर्रिकर अमेरिकेहून परतले; नेतृत्वबदलाच्या अफवांना पूर्णविराम

पणजी: वैद्यकीय उपचारांसाठी अमेरिकेला गेलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर गुरुवारी संध्याकाळी पणजीत परतले. त्यामुळे भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य संचारले होते. 

गेल्या काही महिन्यांपासून वैद्यकीय उपचारांमुळे पर्रिकर स्थानिक राजकारणापासून पूर्णपणे तुटले आहेत. सुरुवातीला मुंबईत उपचार घेतल्यानंतर पर्रिकर अमेरिकेत उपचारांसाठी गेले होते. जून महिन्यात ते भारतात परतले होते. मात्र, त्यानंतर गेल्या आठवड्यात त्यांना उपचारांसाठी अमेरिकेला जावे लागले. 

या अस्थिरतेमुळे गोव्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेचे जोरदार वारे वाहत होते. काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार दिगंबर कामत हे भाजपमध्ये परतणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. सरकार पडण्याच्या अफवांमुळेच पर्रिकर अमेरिकेहून दोन दिवस अगोदरच गोव्यात दाखल झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, या चर्चेला काही अर्थ नसल्याचे भाजपच्या नेत्यांनी सांगितले. परंतु आता पर्रिकर परतल्यामुळे या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.