2600 लिटर Breastmilk दान करुन वाचवले 350000+ बाळांचे प्राण; 'गिनीज'नेही घेतली तिची दखल

Guinness World Record Breastmilk Donation: अशाप्रकारे स्तनांमध्ये निर्माण होणारं दूध दान करता येतं हे ठाऊक नसल्यापासून ते आज साडेतीन लाखांहून अधिक बाळांना वाचवण्यासाठी कारणीभूत ठरलेली महिला असा तिचा प्रवास थक्क करणारा आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 10, 2024, 02:25 PM IST
2600 लिटर Breastmilk दान करुन वाचवले 350000+ बाळांचे प्राण; 'गिनीज'नेही घेतली तिची दखल title=
तिने गिनीज बुकमध्ये नोंदवलं नाव (फोटो गिनीज बूककडून साभार)

Guinness World Record Breastmilk Donation: गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपल्या नावाची नोंद करण्यासाठी बरेच जण काय काय वेगवेगळे प्रयत्न करत असतात. मात्र अमेरिकेमधील टेक्सास येथील एका महिलेने अनोख्या समाज सेवेच्या माध्यमातून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सला आपली दखल घेण्यास भाग पाडलं आहे. या महिलेने मातृत्वाचं आणि वात्सल्याचं दर्शन घडवलं आहे. नवजात बालकांसाठी संजीवनी असणारं स्तनापानाचं दूध सर्वाधिक प्रमाणात दान करण्याचा विक्रम या महिलेने नोंदवला आहे. या महिलने स्वत:चक्क 2 हजार 645.58 लिटर दूध दान केलं आहे. कोणत्याही महिलेने यापूर्वी एवढ्या मोठ्याप्रमाणात स्तनपानासाठीचं दूध दान केलेलं नाही. 

साडेतीन लाख बालकांना वाचवलं

एलसी ओग्लीट्री असं या 36 वर्षीय महिलेचं नाव आहे. ही महिला नॉर्थ टेक्सास मिल्क बँकशी संलग्न आहे. तिने यापूर्वी 2014 सालापासून अस्तित्वात असलेला 1569.79 लिटर दूध दान करण्याचा विक्रम मोडीत काढला आहे. जुलै 2023 पासून ही महिला स्तनपानासाठी दूध दान करत आहे. तिने दान केलेल्या दुधाचं प्रमाण हे आधीच्या विक्रमाला मागे टाकणारं आहे. तिने दान केलेल्या दुधामुळे वेळेआधी जन्माला आलेल्या साडेतीन लाख बालकांना वाचवण्यासाठी मदत झाली आहे.

दूध दान करण्याची सुरुवात कधी झाली?

या महिलेने 2010 साली आपल्या पहिल्या मुलाला म्हणजेच केलीला जन्म दिला. त्यावेळेच आपल्या स्तनांमध्ये बाळाला गरज असलेल्या प्रमाणापेक्षा अधिक दूध निर्माण होत असल्याचं एलसीच्या लक्षात आलं. "आमचं पहिलं बाळ केली रुग्णालयामध्ये होतं. त्यावेळेसच मला जाणवलं की आपल्या शरीरात अधिक दूध तयार होत आहे. तेव्हा मला नर्सने हे दूध तुम्ही दान करु इच्छिता का? असं विचारलं. तोपर्यंत मला हे अशापद्धतीने स्तनांमध्ये निर्माण होणारं दूध दान करता येतं याचीही कल्पना नव्हती," असं एलसी सांगते.

नक्की वाचा >> S*x ला नकार, लग्नही नको, पुरुषांवर बहिष्कार... ट्रम्प जिंकल्याने अमेरिकन महिला आक्रमक; '4B मोहीम' चर्चेत

एवढ्या मोठ्या प्रमाणात तिच्या शरीरात दूध का तयार होतं?

एलसीने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकाऱ्यांना, "मी यामधून पैसे कमवत नाही. चांगल्या कामासाठी पैसे घेता कामा नये असं मला वाटतं," असं सांगितलं. एलीसीने दान केलेल्या दुधामुळे सरोगसीच्या माध्यमातून जन्मलेल्या बाळांबरोबरच आरोग्य विषयक समस्या असलेल्या बालकांनाही मदत झाली आहे. आपल्या शरिरामध्ये एवढ्या प्रमाणात दूध का निर्माण होतं हे शोधण्याचा एलीसीने कधी प्रयत्न केला नाही. मात्र आपण भरपूर पाणी पितो, उत्तम आहार घेतो असं एलीसी सांगितलं. 

इतरांनाही सहभागी व्हावं यासाठी मोहीम

आपण दान केलेल्या दुधाचा एखाद्या बालकाचे प्राण वाचवण्यासाठी उपयोग होतो ही भावना फार सुंदर आहे असं एलीसी सांगते. आपल्याप्रमाणेच अनेक महिलांनी समोर येऊन स्तनपमानासाठी आवश्यक असणारं दूध दान करावं यासाठी एलीसी आता जनजागृती मोहीम राबवत असून या माध्यमातून अधिक अधिक चिमुकल्यांचा जीव वाचवता येईल अशी तिला अपेक्षा आहे.