Narayana Murthy On Sudha Murthy : सॉफ्टवेअर आयकॉन एनआर नारायण मूर्ती यांनी पत्नी सुधा मूर्ती यांना इन्फोसिसमध्ये सहभागी करुन न घेण्याच्या निर्णयाबद्दल दु:ख व्यक्त केले आणि ते म्हणाले की, त्यांनी आता त्यांची भूमिका बदलली आहे. मी चुकलो, नारायण मूर्ती पुढे म्हणाले की, मी तेव्हा प्रचंड आशावादी होतो. त्या काळाचा परिणाम माझ्यावर झाला होता. नारायण मूर्ती यांनी 'त्या' वेळी घेतलेल्या निर्णयावर पश्चाताप व्यक्त केला आहे.
सधा मूर्ती आणि नारायण मूर्ती हे आपल्यासमोर एक आदर्श उभा करतात. अगदी करिअरमध्ये दोघांनी एकमेकांना साथ दिली. पण नारायण मूर्तींनी पत्नीला इन्फोसिसमध्ये सहभागी करुन घेतलं नाही, ही खंत व्यक्त केली. अनेकदा नवरे पत्नीच्या विचारांना फार महत्त्व देत नाहीत. म्हणजे ते त्यांच अस्तित्व नाकारत नाही. पण कोणत्याही निर्णयामध्ये पत्नीचा विचारही तितकाच महत्त्वाचा असल्याच मान्य करत नाही.
प्रत्येक स्त्री ही तिच्या आयुष्यात मल्टी टास्किंग करत असते. घर-मुलं-करिअर अशी तिची कायम तारेवरची कसरत सुरु असते. एकाचवेळी अनेक जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या महिलेला आपण आयुष्यातही तितकेच महत्त्व देणं गरजेचं आहे. कारण स्त्री ही फक्त मनाने नाही तर बुद्धीने देखील तितकाच विचार करुन निर्णय घेते. त्यामुळे पत्नीला आपल्या व्यवसायात महत्त्वाचं स्थान देणं गरजेचं आहे.
अनेकदा आपण अनुभवलं असेल की, कोणताही आर्थिक निर्णय घेताना आपण वडिलांना महत्त्व देतो. पण आईच्या मताला तितकंस महत्त्व नसतं. पण इथेच आपण चुकतो. आर्थिक व्यवहारातही महिलांचे मत देखील तितकेच महत्त्वाचं आहे. सुधा मूर्ती यांनी कायमच आपलं वेगळेपण अधोरेखित केलं आहे. स्त्री आपल्या व्यवसायाकडे एखाद्या लहान बाळाप्रमाणेच बघते. त्यामुळे पहिल्या तीन वर्षात ती बाळाची म्हणजे आपल्या व्यवसायाची विशेष काळजी घेते. आणि तो व्यवसाय वाढायला योग्य पोषक असं वातावरण निर्माण करतं.
नारायण मूर्ती यांनी जाहीरपणे सांगितलं की, सुधा मूर्ती यांना इन्फोसेसमध्ये सहभागी न करुन घेणे हा सर्वात मोठा चुकलेला निर्णय आहे. यावरुन अधोरेखित होतं की, पत्नीच्या निर्णयाला देखील तितकंच महत्त्व देणे गरजेचे आहे. पत्नीला कामातलं काय कळतं? आपल्या कामाचा व्याप तिला काय समजणार? असा अनेकांचा समज असतो. पुरुषांनी हा समज मागे टाकून पत्नीच्या विचारांना तितकेच महत्त्व देणे गरजेचे आहे.
अनेकदा पती पत्नीवर भरपूर प्रेम करत असतो. पण कोणतेही महत्त्वाचे किंवा धाडसी निर्णय घेताना अविश्वास दाखवला जातो. मग ते पैशाचे व्यवहार असो किंवा घरातील महत्त्वाचे निर्णय असोत. नारायण मूर्ती यांनी देखील आपल्या पत्नीच्या व्यावसायिक ज्ञानावर विश्वास ठेवला नाही. त्यामुळे आज त्यांना पश्चाताप करण्याची वेळ आली आहे. नारायण मूर्तींनी केलेली चूक तुम्ही करु नका.