'वर्क-लाइफ बॅलेन्स पटत नाही कारण..; Ola CEO चं म्हणणं! डॉक्टर म्हणाले, 'आकस्मिक मृत्यू...'

Work Life Balance 70 Hour Work Week Premature Death: कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून किती वेळ काम करावं यासंदर्भातील मतभेद असतानाच डॉक्टरांनी यासंदर्भात थेट जीव गमावण्यासंदर्भातील इशारा दिलाय.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 14, 2024, 04:22 PM IST
'वर्क-लाइफ बॅलेन्स पटत नाही कारण..; Ola CEO चं म्हणणं! डॉक्टर म्हणाले, 'आकस्मिक मृत्यू...' title=
ओला सीईओंच्या विधानाने वाद

Work Life Balance 70 Hour Work Week Premature Death: 'ओला' कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भावेश अग्रवाल यांनी इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्तींनी केलेल्या आठवड्यातील 70 तास काम करायला हवं, या विधानाचं समर्थन केलं आहे. तसेच भावेश अग्रवाल यांनी आपण काम आणि खासगी आयुष्याचा समतोल राखला पाहिजे, या विचारसणीला पाठिंबा देत नसल्याचं म्हटलं आहे. मात्र यावर प्रतिक्रिया नोंदवताना एका वरिष्ठ डॉक्टरांनी, अशाप्रकारे काम केल्यास अनेक गंभीर आजार होण्याचा धोका वाढून शकतो असा इशारा दिला असून अवेळी मृत्यूचा धोकाही शक्य असल्याचं म्हटलं आहे.

70 तास काम करायलाच हवं कारण...

"जेव्हा नारायण मूर्तींनी ते (आठवड्यातून 70 तास काम करायला हवं असं) म्हटलं तेव्हा मी उघडपणे त्याला पाठिंबा दिला होता. मला यासाठी सोशल मीडियावरुन ट्रोल करण्यात आलं. मात्र मी त्याबद्दल चिंता करत नाही कारण मला ठाम विश्वास आहे की, एका पिढीला तपस्या करावीच लागणार आहे. असं केलं तरच आपल्याला जगातील पहिल्या क्रमांकाचा देश आणि सर्वात मोठी अर्थव्यसव्था घडवता येईल," असं भावेश अग्रवाल यांनी नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये म्हटलं आहे.

नारायण मूर्ती काय म्हणालेले?

2023 साली ऑक्टोबर महिन्यामध्ये नारायण मूर्ती यांनी एका मुलाखतीमध्ये, "भारताला मागील 2 ते 3 दशकांमध्ये प्रचंड प्रगती केलेल्या इतर देशांच्या अर्थव्यवस्थेची स्पर्धा करायची असेल तर तरुणाईने आठवड्यातून 70 तास काम करणं गरजेचं आहे," असं म्हटलं होतं. नंतर यावरुन संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. अगदी कॉर्परेटपासून स्टार्टअपपर्यंत अनेक क्षेत्रातील तज्ज्ञांनी यावर मतं व्यक्त केली होती. 

...म्हणून वर्क-लाइफ बॅलेन्स पटत नाही

"मला वर्क-लाइफ बॅलेन्स करणं ही कनसेप्टही पटत नाही. यामागील कारण म्हणजे, तुम्हाला तुमचं काम करताना आनंद मिळत असेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यात समाधानी, आनंदी असाल. तुम्ही कामही कराल आणि आनंदीही राहाल. दोघांमध्ये उत्तम समन्वय असेल," असं भावेश अग्रवाल यांनी पुढे म्हटलं.

नक्की वाचा > महिना 2.25 लाख पगार.. 'या' देशानं बदलला किमान वेतनाचा नियम; राहतात केवळ 42000 भारतीय

हदयविकाराचा धोका 35 टक्क्यांनी

मात्र भावेश यांच्या या विधानावर बोलताना हैदराबादमधील अपोलो हॉस्पीटलमधील न्यूरोर्जन असलेल्या डॉक्टर सुधीर कुमार यांनी, "आठवड्यातून 55 किंवा त्याहून अधिक तास काम करणं हे हदयविकाराचा धोका 35 टक्क्यांनी वाढणारं आहे. तसेच आठवड्यातून 35 ते 40 तास काम करण्याच्या तुलनेत 55 तास किंवा अधिक वेळ काम केल्यामुळे हृदयाशीसंबंधित आजारांमुळे मृत्यू होण्याचा धोका 17 टक्क्यांनी वाढतो," असं म्हटलं आहे. दरवर्षी आठवड्याला 55 तासांपेक्षा अधिक वेळ काम करणाऱ्या 8 लाख लोकांचा मृत्यू होतो, असंही डॉ. कुमार पुढे म्हणाले.

जास्त तास कम करणाऱ्यांना हे धोके

"जास्त कामाचे तास हे वजनवाढीशी संलग्न असतं. यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो. जे लोक आठवड्याभरात 69 तास किंवा त्याहून अधिक काळ काम करतात त्यांना ताणतणावाचा त्रास होण्याची शक्यता ही आठवड्यातून 40 तास काम करणाऱ्यांपेक्षा अधिक असते," असंही डॉक्टर कुमार म्हणाले. त्यामुळेच जास्त तास काम करणं हे अनेक गंभीर आजार आणि वेळेआधीच मृत्यूच्या धोक्याला आमंत्रण देणारं असतं हे निश्चित आहे. 

...म्हणून CEO जास्त काम करायला सांगतात

"मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांच्या कर्मचाऱ्यांना जास्त तास काम करण्याचा सल्ला देणं हे त्यांच्या कंपनीचा नफा वाढवण्याच्या दृष्टीने आणि त्यांची स्वत:ची संपत्ती वाढवण्यासाठी सागतात. कर्मचारी आजारी पडला तर त्याच्या जागी सहज दुसऱ्याला स्थान दिलं जातं," असंही डॉक्टर कुमार म्हणाले.