16 आमदार अपात्रता प्रकरण : सुप्रीम कोर्टाची राहुल नार्वेकरांना नोटीस

16 mla disqualification issue: शिंदे गटाचे नेते सुनील प्रभू यांनी सुप्रीम कोर्टात या प्रकरणासंदर्भात विधानसभा अध्यक्षांकडून तातडीने निर्णय घेण्यात यावा अशी मागणी करणारी याचिका करण्यात आली होती.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 14, 2023, 12:37 PM IST
16 आमदार अपात्रता प्रकरण : सुप्रीम कोर्टाची राहुल नार्वेकरांना नोटीस title=
सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्देश

16 mla disqualification issue: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सुप्रीम कोर्टाने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांना नोटीस पाठवली आहे. या प्रकरणामध्ये शिंदे गटाचे नेते सुनील प्रभू यांनी सुप्रीम कोर्टात या प्रकरणासंदर्भात विधानसभा अध्यक्षांकडून तातडीने निर्णय घेण्यात यावा अशी मागणी करणारी याचिका करण्यात आली होती. याच याचिकेवर सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने संबंधित प्रकरणावर राहुल नार्वेकर यांनी 2 आठवड्यांमध्ये लेखी उत्तर द्यावं असं कोर्टाने म्हटलं आहे. 

नोटीशीत काय म्हटलं आहे?

अपात्रतेच्या निर्णयाला उशीर का होतोय याचं उत्तर द्यावं अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या नोटीसमध्ये करण्यात आली आहे. आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील प्रक्रिया कशी सुरु आहे याबद्दलची सविस्तर माहिती द्यावी असंही सुप्रीम कोर्टाने नोटीसमध्ये म्हटलं आहे.

प्रकरणाच्या प्रक्रीयेवर काही परिणाम होणार का?

अ‍ॅडव्हकेट सिद्धार्थ शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 मे रोजी सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला तेव्हा सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी मर्यादित कालमर्यादेमध्ये हे प्रकरण अध्यक्षांनी निकाली काढावं असं म्हटलं होतं. त्यावर आता 2 महिने उलटले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या सुट्ट्या संपल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्यावतीने सुनील प्रभूंनी याचिका दाखल केली होती. या याचिकेमध्ये सुप्रीम कोर्टाने अध्यक्षांकडे या प्रतिक्रियेसंदर्भात विचारणा करण्याची मागणी केली होती.  नॉर्मल प्रोसेसनुसार अध्यक्षांना कोर्टाने नोटीस दिली आहे. लेखी उत्तर देण्यासाठी न्यायालयाने नार्वेकरांना 2 आठवड्यांचा वेळ दिलाय. अध्यक्ष 2 आठवड्यांच्या आत लेखी उत्तर मांडतील. यामुळे अपात्रतेसंदर्भात सध्या सुरु असलेल्या प्रतिक्रियेवर काहीही परिणाम होणार नाही असंही सिद्धार्थ शिंदे म्हणाले.

प्रकरण काय?

महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री असलेल्या शिंदेंनी जून 2022 मध्ये आपल्यास सरकारविरोधात बंड केलं तेव्हा त्यांच्याबरोबर सुरुवातीला 16 आमदार होते. शिंदेंसहीत हे 16 आमदार सुरतला गेले होते. यानंतर मूळ शिवसेनेनं या बंडखोरीनंतर या आमदारांना नोटीस बजावली होती. या नोटीशीला 48 तासांमध्ये उत्तर द्यावे नाहीतर तुम्हाला अपात्र ठरवलं जाईल असं या नोटीसमध्ये म्हटलं होतं. या नोटीसविरोधात शिंदे गटाने थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यानंतर गुवहाटीला गेलेल्या शिंदे गटामध्ये मूळ शिवसेनेतील 40 आमदार मिळाले. त्यामुळेच अपात्रतेची नोटीस या 16 आमदारांना पाठवण्यात आली होती. नोटीसमध्ये सुरतला गेलेल्या आमदारांच्याच नावांचा उल्लेख आहे. ज्यामध्ये नंतर शिंदे गटात सहभागी झालेल्या 24 आमदारांचा समावेश नव्हता. म्हणूनच बंडखोरी करुन भाजपाबरोबर सत्ता स्थापन करणाऱ्या बंडखोर आमदारांची संख्या 40 असली तरी अपात्रतेच्या कारवाईमध्ये 16 आमदारांचं नावं आहे.

अपात्रतेची टांगती तलवार असणाऱ्या आमदारांची यादी

1) एकनाथ शिंदे

2) अब्दुल सत्तार

3) संदीपान भुमरे

4) संजय शिरसाट

5) तानाजी सावंत

6) यामिनी जाधव

7) महेश शिंदे

8) संजय रायमूलकर

9) रमेश बोरणारे

10) बालाजी कल्याणकर

11) चिमणराव पाटील

12) भरत गोगावले

13) लता सोनवणे

14) प्रकाश सुर्वे

15) बालाजी किणीकर

16) अनिल बाबर