अमर काणे, झी मीडिया, नागपूर : वॉकरमधून पडून एका १७ महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही हृदयद्रावक घटना नागपुरातील जाटतररोडी परिसरात घडली. रंजीत ठाकरे असं मृत बाळाचं नाव आहे. सारंग आणि पौर्णिमा ठाकरे यांचा रंजीत एकुलता एक मुलगा आहे. रंजीत थोडासा अशक्तचं होता. १३ जानेवारी रोजी तो खेळता-खेळता वॉकरमधून पडला. त्यामुळे त्याच्या डोक्याला दुखापत झाली होती.
दुखापत झाल्यामुळे ट्रामा सेंटरमध्ये त्याच्यावर उपचार सूरू होते. मात्र १८ जानेवारी रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. त्यामुळे आता लहान मुलांना खेळण्यासाठी वॉकर द्यावा की नाही असा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत आहे.
रंजीत परिसरात अत्यंत लाडका होता. जेव्हा ही दुर्दैवी घटना घडली तेव्हा तो खेळत होता. तो खेळत असल्यामुळे त्याची आई स्वयंपाक बनवण्यासाठी घरात गेली. त्यानंतर लगेचच त्याचा तोल जावून तो खाली पडला अशी प्रतिक्रिया शेजाऱ्यांनी दिली आहे.
जर वॉकरची गरज असल्यास तो लहान मुलांसाठी घेण्याचा सल्ला डॉ. योगेश वाईकर यांनी पालकांना दिला आहे. शिवाय मुलांकडे खेळताना लक्ष ठेवण्याचाही सल्ला दिला जात आहे.
सतरा महिन्यांच्या रंजीतच्या अशा दुर्दैवी मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. पालकांनी लहान मुलांबाबत किती दक्ष रहावं हे या घटनेनंतर पुन्हा एकदा समोर आलं आहे.