नाशिक : नाशिक जिल्ह्यातल्या कळवण तालुक्यात सावरपाडा भागात गॅस्ट्रोने थैमान घातलं आहे. गॅस्ट्रोमुळे आतापर्यंत दोघांचा बळी गेला आहे. किमान १०० ग्रामस्थांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे. पंढरीनाथ बर्डे आणि चंद्रा ठाकरे या दोन जणांचा गॅस्ट्रोमुळे मृत्यू झाला आहे. तर एका महिलेची प्रकृती चिंताजनक आहे.
पुनंद धरणातून सटाणा शहरासाठी जलवाहिनी टाकण्याचं काम सुरू आहे. खोदकामात सावरपाडा गावाला पुरवठा करणारी वाहिनी फुटली त्यात गटारीचं पाणी मिसळल्याने गॅस्ट्रोची लागण झाल्याचा अंदाज आहे.
मध्यरात्रीनंतर ग्रामस्थांना अचानक उलट्या, जुलाब यांचा त्रास होऊ लागला. अचानक रूग्णांची संख्या वाढल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात अक्षरशः जमिनीवर रूग्णांना झोपवून उपचार करावे लागले. २० रूग्णांना कळवण उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.