धार्मिक कार्यक्रमात अविघ्न, भगर खाल्ल्याने तीन हजार भाविकांना विषबाधा, नांदेडमध्ये खळबळ

Nanded Food Poisoning: धार्मिक कार्यक्रमात भगर खाल्याने जवळपास तीन हजार जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.   

Updated: Feb 7, 2024, 03:09 PM IST
धार्मिक कार्यक्रमात अविघ्न, भगर खाल्ल्याने तीन हजार भाविकांना विषबाधा, नांदेडमध्ये खळबळ title=
3000 suffer food poisoning after meal at religious event in Nanded

Nanded Food Poisoning: संत बाळू मामा यांच्या धार्मिक कार्यक्रमात भगर खाल्ल्याने तब्बल तीन हजारांहून अधिक जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील ही घटना आहे. कोष्टवाडी या गावात मंगळवारी बाळु मामांच्या मेंढ्या आल्या होत्या. त्या निमित्त संत बाळुमामा यांचा पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता. रात्री आरतीचा कार्यक्रम झाल्यानंतर भंडारा होता. काल एकादशी असल्यामुळे भाविकांना भगर हा महाप्रसाद ठेवण्यात आला होता. 

कार्यक्रमासाठी जवळपास 5 हजार भाविक इथे जमले होते. रात्री आरतीनंतर महाप्रसाद ठेवण्यात आला होता. मंगळवारी एकादशी असल्याने प्रसादात भगर आणि शेंगदाणा कढी होती. भाविकांना भगर खाल्यानंतर अचानक उलटी, मळमळ, चक्कर येणे असा त्रास सुरू झाला. या कार्यक्रमाला कोष्टवाडी या गावासह सावरगाव, हरणवाडी , पेंडु , सादलापुर या गावातील नागरिक आले होते. त्यांना देखील विषबाधा झाली. विषबाधा झालेल्यांमध्ये महिलांचा समावेश अधिक आहे. भाविकांना त्रास व्हायला सुरुवात झाल्यानंतर त्यांना मिळेल त्या वाहनांनी रुग्णालयात पाठवण्यात आले. 

लोहा येथील उपजिल्हा रुग्णालयात तसेच खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. रुग्णाची संख्या अधिक असल्याने नांदेडच्या शासकीय रुग्णालयात देखील रुग्णांना दाखल करण्यात आले. रुग्णांवर उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांनी सांगितले आहे. 

दरम्यान, जवळपास साडेपाचशे भाविकांना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले तर काही रुग्णांना लातूर जिह्यातील अहमदपूर मधील रुग्णालयात पाठवण्यात आले. परभणी जिल्ह्यात परत गेलेल्या काही भाविकांनाही विषबाधा झाल्याचे समोर येत आहे. नेमकी ही विषबाधा नकश्यामुळे झाली हे तपासण्यासाठी अन्न औषध प्रशासन आणि आरोग्य पथक कोष्टवाडी गावात दाखल झाले असून त्यांनी कालच्या अन्नाचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. 

दरम्यान माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात भेट देऊन विषाबधितांची विचारपूस केली. जवळपास तीन हजार लोकांना विषबाधा झाल्याची माहिती चव्हाण यांनी दिली. सध्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून धोक्याबाहेर आहे. 

परभणीतील गावकऱ्यांनाही विषबाधा

कार्यक्रमातून परभणीत परतलेल्या 100 भाविकांना जुलाब उलटीचा त्रास झाला लोकांना हा त्रास होत असल्याचे लक्षात आल्यानंतर गावकऱ्यांना भगरीतून विषबाधा झाल्याचे लक्षात आले. रात्री उशिरा नागरिकांना परभणीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सदर माहिती मिळाल्यावर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आरोग्य विभागाला सोबत घेत गावकऱ्यांवर गावातच उपचार सुरू केले तर काहींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.