किल्ले रायगडावर रंगला ३४६ वा 'शिवराज्याभिषेक' सोहळा

शुक्रवारपासून या सोहळ्याला सुरुवात झाली होती. प्रारंभी गडदेवता असलेल्या शिरकाई देवीचे पूजन करण्यात आले

Updated: Jun 15, 2019, 11:25 AM IST
किल्ले रायगडावर रंगला ३४६ वा  'शिवराज्याभिषेक' सोहळा title=

प्रफुल्ल पवार, झी २४ तास, रायगड : हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिथीप्रमाणे ३४६ वा राज्याभिषेक सोहळा आज मोठया उत्साही आणि जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा होतोय. शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, कोकणकडा मित्र मंडळ व रायगड जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या सोहळ्याचे यंदा रौप्य महोत्सवी वर्ष आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय.


राज्याभिषेक सोहळा

आज सकाळी शिवपालखीची वाजत गाजत मिरवणूक निघाली. यात शिवभक्त बेधुंद होऊन नाचताना दिसले. ध्वजारोहणानंतर शिवपालखी राजदरबारात आल्यानंतर मुख्य सोहळ्यास सुरुवात झाली. प्रकाशस्वामी जंगम यांनी केलेल्या मंत्रोच्चारात शिवपुतळ्यास जलाभिषेक, सुवर्ण मुद्राभिषेक करण्यात आला. इतिहास अभ्यासक आप्पा परब आणि संतोष धनावडे यांनी यावेळी सपत्निक पूजन केले. यावेळी 'जय भवानी, जय शिवाजी'च्या घोषाने परिसर दुमदुमून गेला. 


राज्याभिषेक सोहळा

राजदरबार ते शिवसमाधी अशा पालखी मिरवणुकीने सोहळ्याची सांगता झाली. ढोलताशांचा गजर, भगवे झेंडे आणि शिवरायांचा जयघोष यामुळे वातावरण शिवमय होऊन गेले. पाऊस असूनदेखील या सोहळ्यासाठी हजारो शिवभक्त रायगडी दाखल झाले होते, हे विशेष.

 


राज्याभिषेक सोहळा

शुक्रवारपासून या सोहळ्याला सुरुवात झाली होती. प्रारंभी गडदेवता असलेल्या शिरकाई देवीचे पूजन करण्यात आले. सायंकाळी शिवतुला पूजन करण्यात आले. यात अनेक भक्तांनी आपल्याकडील वस्तू दान केल्या. रात्री 'शाहिरी रात्र' या कार्यक्रमात शिवाजी महाराजांचे गुणगान गाणारे पोवाडे आणि गीतेही सादर करण्यात आली.