Shinde Fadnavis Cabinet Expansion : कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे विरुद्ध भाजप असा कलगीतुरा सुरुच आहे. राजीनामा देण्याच्या शिंदेंच्या विधानावरुन भाजपनं प्रत्युत्तर दिले आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाला तर मागे उभं राहणं आमचं कर्तव्य आहे असं विधान सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले. तुम्ही 2014 आणि 2019 ला भाजपमुळेच निवडून आला होतात असा टोलाही चव्हाणांनी खासदार शिंदेंना लगावला. दरम्यान ज्या पोलीस अधिका-यावरुन शिंदे-भाजपत वादाची ठिणगी पडलीय त्या अधिका-याची चौकशी करण्याची मागणी भाजपनं केलीय. लवकरच या पोलीस अधिका-याची ईडी चौकशी सुरु होईल असं भाजपनं म्हटल आहे.
शिंदे-फडणवीस सरकारचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार लवकरच पार पडणार आहे. विस्तारात कॅबिनेटमंत्रीपदी वर्णी लागावी यासाठी शिवसेना-भाजप नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. अशात शिंदे गटातील 5 विद्यमान मंत्र्यांना डच्चू मिळावा यासाठी भाजपकडून दबाव येत असल्याचं समजतंय.
असमाधानकारक कामगिरी आणि वादग्रस्त कार्यशैलीमुळे शिवसेनेच्या पाच मंत्र्यांबाबत भाजपच्या वरिष्ठ वर्तुळात कमालीची नाराजी असून त्यांच्या गच्छंतीची सूचना दिल्लीतील भाजप धुरिणांनी दिल्याचं समजते. कृषिमंत्री अब्दुल सत्तार, रोहयो मंत्री संदिपान भुमरे, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री संजय राठोड यांना डच्चू मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारासंबंधी मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वात लवकरच बैठक होणार आहे. या बैठकीत अंतिम निर्णय होणार असल्याचं अब्दुल सत्तारांनी सांगितल आहे.
शिंदेंच्या मंत्र्यांना डच्चू देण्यात येणार असल्याच्या चर्चांमुळे ठाकरे गटाला टीका करण्याची आयती संधी मिळाली आहे. तर, शिंदेंच्या आमदारांना डच्चू मिळणार असल्याच्या चर्चा म्हणजे आमदारांमध्ये धुसफूस निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा पलटवार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केला आहे.
एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असणा-या ठाणे आणि त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदेंच्या कल्याण लोकसभा मतदारसंघांवर भाजपनं आधीच दावा ठोकला आहे. त्यात शिंदेंच्या विद्यमान मंत्र्यांना डच्चू देण्यासाठी भाजपकडून दबाव येत असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यामुळे शिंदे गटाची भाजपमागे फरफट होतेय आणि शिंदे गट भाजपच्या गळ्यातलं ओझं बनत चाललाय असे आरोप करण्याची आयती संधी विरोधकांना मिळाली आहे.