Mucermycosis : लहान मुलांना सर्वाधिक धोका; ५ महिन्यांच्या चिमुकलीने गमावला जीव

पालकांनो लहान मुलांची सगळ्यात जास्त काळजी घ्या, कोरोनापाठोपाठ म्युकरमायकोसिसचा धोका वाढतोय 

Updated: Jun 15, 2021, 04:09 PM IST
Mucermycosis : लहान मुलांना सर्वाधिक धोका; ५ महिन्यांच्या चिमुकलीने गमावला जीव  title=

प्रशांत शर्मा, झी मीडिया, शिर्डी : एक धक्कादायक माहिती. म्युकरमायकोसिसमुळे अवघ्या ५ महिन्यांच्या चिमुकलीने आपला जीव गमवला आहे. अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना शिर्डीत ही घटना घडली. या घटनेनंतर हळहळ व्यक्त होत आहे. या चिमुकलीला आधी कोरोना झाला होता. (5 Months old baby girl died due to Mucermycosis )

कोपरगाव तालुक्यातील कोरके कुटुंब शिर्डीत रहिवासी आहे. त्यांना दोन मुली आहे. परिस्थिती सामान्यच आहे. लहान मुलगी ५ महिन्यांची आहे. मे महिन्यात या मुलीला जुलाब, उलट्या असा त्रास सुरु झाला होता. तिला कोपरगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. नंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नाशिक येथे हलविण्यात आले. तिच्यावर उपचार करण्यात आले. कोरोना चाचणी करण्यात आली.

ती निगेटिव्ह आली होती. तिचे रक्त तपासणी करण्यात आली तेव्हा असता तिच्यामध्ये अँटीबॉडिज तयार झाल्याचे आढळून आले. त्यामुळे तिला लक्षणे विरहित कोरोना होऊन गेल्याचे निदान डॉक्टरांनी केले. त्यानुसार उपचार सुरू करण्यात आले. तरीही तिच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत नव्हती. नंतर तिचा चेहरा, डोळे आणि अंगावर सूज आल्याचे आढळून आले. ही म्युकरमायकोसिसची लक्षणे असल्याचे पाहून डॉक्टरांनी त्यानुसार उपचार करण्याचा सल्ला दिला.

लोणी येथील प्रवरा रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु आहेत. इतक्या कमी वयात या आजाराची लागण झाल्याने आरोग्य विभाग हादरले.  राज्यामध्ये सर्वाधिक कोरोनाग्रस्त लहान मुलं नागपूर आणि पुण्यामध्ये आढळून आले आहेत. एकूण राज्यांमध्ये  झिरो ते 18 वयोगटातील 27 मुलं म्युकरमायकोसिसने बाधित झाल्याच  समोर आला आहे. राज्यात 18 ते 45 वयोगटातील 2435, 45 ते 60 वयोगटात 3093 तर 60 च्या वर वय असलेल्यांमध्ये 1980 रुग्ण बाधित झाले आहेत .

कमी वयात म्हणजे लहान मुलांमध्ये तुलनेत ही आकडेवारी कमी आहे. म्युकरमायकोसिसचा  वाढता प्रादुर्भाव बघता हा आजार झाल्याने बाल रोग तज्ज्ञ आणि नाक कान डोळे तज्ज्ञ डॉक्टरांपुढे आव्हान उभे राहिले आहे.