बदलापूरमधून थेट अमेरिकेला रवाना; गणपती बाप्पाची परदेशवारी

बाप्पाच्या आगमनाला फक्त 3 महिने शिल्ल्क राहिले आहेत. बदलापुरमधून बाप्पाच्या मूर्ती अमेरिकेला रवाना झाल्या आहेत. 

Updated: Jun 8, 2024, 11:18 PM IST
बदलापूरमधून थेट अमेरिकेला रवाना; गणपती बाप्पाची परदेशवारी title=

Ganeshotsav 2024:  बदलापूर शहरातून गणपती बाप्पा थेट अमेरिकेला रवाना झालेत. परदेशातल्या भारतीयांना गणेशोत्सव साजरा करता यावा, यासाठी चिंतामणी क्रिएशन्सच्या माध्यमातून दरवर्षी हजारो पर्यावरणपूरक गणेशमूर्ती परदेशात पाठवल्या जातात...यंदा 80 हजार बाप्पा परदेशी रवाना झाले आहेत.

गणेशोत्सवाला अद्याप तीन महिने बाकी असले, तरी मूर्तिकार मात्र आत्तापासूनच तयारीला लागले आहेत. त्यातही परदेशात असलेल्या भारतीयांनाही बाप्पांचा पाहुणचार करता यावा यासाठी बदलापूरचे तरुण उद्योजक निमेश जनवाड यांच्या चिंतामणी क्रिएशन्सकडून दरवर्षी हजारो गणपती बाप्पा परदेशात पाठवले जातात. बाप्पांचा हा प्रवास लांबचा असल्यानं अगदी 6 महिने आधीपासूनच गणपती बाप्पांच्या परदेशवारीला सुरुवात होते. 

मार्च ते जुलै महिन्याखेरपर्यंत बाप्पांची ही परदेशवारी अखंडपणे सुरू असते.  ज्यात हजारो गणपती बाप्पा आपल्या परदेशातल्या भक्तांकडे रवाना होत असतात. दरवर्षी अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, युरोप, आखाती देश, सिंगापूर, मलेशिया, थायलंड, ऑस्ट्रेलिया अशा जगातल्या अनेक देशांमध्ये निमेश जनवाड हे गणेशमूर्ती पाठवत असतात. त्यामुळे परदेशात वास्तव्याला असलेले भारतीय तिकडे राहून आपल्या लाडक्या बाप्पाचा पाहुणचार करू शकतात. यंदा निमेश जनवाड यांच्या माध्यमातून 80 हजार बाप्पा परदेशवारीला रवाना झाले आहेत.

काही सेकंदात रेल्वे तिकीट फुल्ल 

गणेशोत्सवासाठी चाकरमानी मोठ्या प्रमाणात कोकणात रेल्वेने जातात. नुकतीच गणपतीसाठी रेल्वेचं बुकींग सुरू झालंय. तिकीट आरक्षणासाठी चाकरमान्यांची धावपळ सुरू झालीय. मात्र काही सेकंदात रेल्वे तिकीट फुल्ल होत असल्याने त्यांच्या पदरी निराशाच पडत आहे. गेले तीन दिवस पहिल्या रांगेतील पहिल्या व्यक्तीलादेखील तिकीट मिळत नाही. त्यामुळे चाकरमान्यांनी नाराजी व्यक्त केलीय. कोकण रेल्वेच्या तिकीट आरक्षणात काहीतरी गौडबंगाल असल्याचा आरोप प्रवाशांनी केलाय.