अमरावती : नवनीत कौर राणा यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेय. मुंबई उच्च न्यायालयाने तसा निर्णय दिलाय.
अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या अमरावती लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढविणार्या नवनीत कौर-राणा यांचे जात वैधता प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने रद्द करण्याचा निर्णय बुधवारी दिला.
अमरावती येथील जयंत वंजारी व राजीव मानकर यांनी नवनीत कौर यांचे जात वैधता प्रमाणपत्र बनावट असल्याचा दावा करुन मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्या.बी.आर.गवई व न्या.रियाज छागला यांच्या खंडपिठापुढे सुनावणी झाली. न्यायमूर्तींनी आज या प्रकरणात निकाल दिला.
जी शाळा अस्तित्वातच नाही, ती शाळा सोडल्याचा दाखला कसा दिला जातो आणि या आधारावर तयार झालेले जात प्रमाणपत्र ग्राह्य धरता येणार नाही, असे स्पष्टीकरण उच्च न्यायालयाने आपल्या निकालात केले आहे.
आता नवनीत कौर यांनी पंजाबच्या रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र दिले आहे, त्याबाबतही चौकशी करुन तीन महिन्यात अहवाल देऊन निर्णय घेण्याचे निर्देश न्यायालयाने जात वैधता समितीला दिले आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे नवनीत कौर-राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना जोरदार धक्का बसला आहे.