Viral Rap Song On Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत मोठे बंड केले. 40 आमदारांना सोबत घेत त्यांनी ठाकरेंची साथ सोडली. यानंतर राज्यात सत्तांतर झाले. या सर्व घडामोडींनतर 50 खोके, गद्दार हे शब्द चांगलेच चर्चेत आले. ठाकरे गटाकडून या शिंदेगटावर गद्दार, चोर असे आरोप केले जातात. 50 खोके आणि चोर या शब्दांचा वापर करत एका रॅपरने शिंदे गटावर गाणं तयार केले. हे गाण सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. शिंदे गटावर गाणं बनवणाऱ्या रॅपरविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
राज मुंगासे असे या रॅपरचे नाव आहे. मुंगासे विरोधात अंबरनाथमधील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रॅपर राज मुंगासे याचे चोर आले, चोर आले, पन्नास खोके घेवून चोर आले अशा प्रकारचे गाणं सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या रॅपरच्या विरोधात शिंदे गटाकडून अंबरनाथ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिंदे गटाच्या युवासेना कोअर कमिटी सदस्य स्नेहल कांबळे ह्यांनी रॅपर राज मुंगासे ह्याच्याविरोधात अंबरनाथ पोलिसांत तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांकडून मुंगासे याच्या विरोधात बदनामीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रॅपरने सरकार विरुद्ध बदनामीकारक रॅप केले असल्याचा आरोप कांबळे यांनी तक्रारीत केला आहे. हा रॅपर छत्रपती संभाजीनगरचा आहे. याप्रकरणी मुंगासे याला अटक होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे ठाण्यातील ठाकरे गटाच्या युवासेनेतील पदाधिकारी रोशनी शिंदे मारहाण प्रकरणानं धक्कादायक ट्विस्ट आला आहे. मुख्यमंत्री शिंदेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याप्रकरणी रोशनी शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर रोशनी शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती ठाण्याचे अप्पर पोलीस आयुक्त पंजाबरकाव उगले यांनी दिली. तर हा कट ठाण्याचे ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी केल्याचा आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात शिंदे आणि ठाकरे गटात जोरदार मारहाण झाली. ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे यांना शिंदे गटाकडून मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. रोशनी शिंदे या ठाकरे गटाच्या युवासेनेच्या कार्यकर्त्या आहेत. फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप करत शिंदे गटाने रोशनी शिंदेंना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. रोशनी शिंदे यांच्यावरखासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.