थंडीपासून बचावासाठी बकरीला शर्ट, करडूला टी-शर्ट

ऐकावं ते नवलच.... 

Updated: Dec 16, 2019, 10:17 PM IST
थंडीपासून बचावासाठी बकरीला शर्ट, करडूला टी-शर्ट title=

नितेश महाजन, झी मीडिया, जालना : देशात अनेक ठिकाणी थंडीची लाट असतानाच आता राज्यातही बऱ्याच ठिकाणी असंच काहीसं चित्र पाहायला मिळत आहे. राज्यभरातही आता थंडीचा कडाका वाढू लागला आहे. 

थंडीपासून बचावासाठी आपण नियमित स्वेटर, मफलरचा वापर करतो. पण या थंडीचा फटका मुक्या प्राण्यांना बसू नये म्हणून....? असा विचार कधी केला आहे का? बरं केलाही असेल तर त्यावर काही कृती केली आहे? या साऱ्याचाच विचार  जालन्यातील टेंभुर्णी गावातील एका कुटुंबाने अनोखी शक्कल लढवली आहे. या कुटुंबाकडे असलेल्या शेळ्यांना घरातील निरुपयोगी शर्ट घालायला त्यांनी सुरुवात केली आहे. 

जालना जिल्ह्यातील टेंभूर्णीच्या गावकऱ्यांना  थंडी आल्याची वर्दीच मिळाली. कारण त्यांच्या गावातल्या सलीम बागवान यांच्या बकऱ्यांच्या अंगावर कपडे दिसू लागले आहेत. दरवर्षी थंडी आली की, सलीम बागवान यांच्या घरच्या बकऱ्यांच्या अंगावर कपडे दिसू लागलात. त्यांच्या बकरीला शर्ट घालण्यात आला आहे, करडूच्या अंगावर टी-शर्ट चढवण्यात आला आहे. बोचऱ्या थंडीपासून बचाव करण्यासाठी दरवर्षी बागवान यांच्या घरच्या शेळ्यांना कपडे चढवले जातात. आहे की नाही ही अनोखी आणि तितकीच स्तुत्य कृती? 

 

शेळ्यांचे हे कपडे दिवसाआड बदलले जातात. बागवान कुटुंबीय यासाठी शेजाऱ्यांकडून जुने कपडे मागून आणतात. मुक्या प्राण्यांना थंडी लागते हे सांगता येत नाही. त्यामुळं बकऱ्यांना स्वतःहून कपडे घातल्याचं बागवान सांगतात.  बकऱ्यांना कपडे घालण्यासाठी सलीम यांचे कुटुंबीयही मदत करतात. त्यांची मुलगी मरिना हिचा त्यात पुढाकार असतो. बागवान कुटुंबीय़ांच्या भूतदयेचं कौतुक आहे. कपडे घाललेल्या शेळ्या पाहणं हे गावकऱ्यांसाठीसुद्धा आकर्षणाचा विषय ठरत आहे.