निलेश वाघ, झी मीडिया, सटाणा : ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याच्या हल्ल्यात एक शेतकरी जखमी झाल्याची घटना घडली आहे. सटाणा तालुक्यातील द्याने येथे हा प्रकार घडला.
लोटन कापडणीस असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. लोटन हे बोळाई शिवारात चुलत भावाच्या शेतात काम करत होते. त्यावेळी ऊसाच्या शेतात काहीतरी आवाज येत असल्याने ते पाहण्यासाठी गेले. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत.
सध्या त्यांच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. बोळाई शिवारात चार ते पाच बिबट्याचा वावर असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले आहे. वनविभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.