ट्रॅकवर सिमेंटचा मोठा ब्लॉक, वेगाने येणारी ट्रेन अन् नंतर...; सोलापुरातील घटनेनंतर खळबळ

कानपूर आणि अजमेरनंतर आता सोलापूरमध्ये मालगाडी रुळावरुन उतरवण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. सोलापुरात रेल्वे लाईनवर मोठा दगड सापडला आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांनी यासंबंधी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.   

शिवराज यादव | Updated: Sep 10, 2024, 01:25 PM IST
ट्रॅकवर सिमेंटचा मोठा ब्लॉक, वेगाने येणारी ट्रेन अन् नंतर...; सोलापुरातील घटनेनंतर खळबळ title=

उत्तर प्रदेशच्या कानपूर आणि राजस्थानच्या अजमेरनंतर आता सोलापुरात मालगाडीचा अपघात करण्याचा कट आखण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कुर्डुवाडी स्थानकापासून जवळपास एक किमी दूर रेल्वे ट्रॅकवर सिमेंटचा मोठा दगड सापडला आहे. लोको पायलटने प्रसंगावधाना दाखवल्याने दुर्घटना टळली. याप्रकरणी रेल्वेच्या सिनिअर सेक्शन इंजिनिअरने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

सोलापूरमधील कुर्डुवाडी रेल्वे स्टेशनपासून जवळपास 700 मीटर दूर सिग्नल पॉईंटजवळ रेल्वे दुर्घटना करण्याच्या हेतूने एक मोठा दगड ठेवण्यात आला होता. याप्रकरणी सिनिअर सेक्शन इंजिनिअर कुंदन कुमारने अज्ञात आरोपींविरोधात तक्रार दाखल केली आहे. 

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री जवळपास 8.30 वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने कुर्डुवाडी रेल्वे स्थानकापासून 700 मीटर अंतरावर सिमेंटचा दगड ठेवला होता. यादरम्यान लोको पायलट रियाज शेख आणि जेई उमेश इलेक्ट्रिक रेल्वेच्या ओव्हरहेड वायर्सच्या देखभालीसाठी टॉवर वॅगनला सोलापूर येथून कुर्डुवाडीला घेऊन येत होते. रुळावर दगड पाहिल्यानंतर त्यांनी 200 मीटर आधीच मालगाडी थांबवली आणि संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तपास करत आहेत.

अजमेरमध्ये मालगाडीचा अपघात करण्याचा प्रयत्न

याआधी राजस्थानच्या अजमेरमध्येही मालगाडीचा अपघात करण्याचा प्रयत्न केल्याचा कट आखल्याचं समोर आलं आहे. अजमेरच्या सरधना येथे रविवारी रात्री ट्रॅकवर 70 किलोचे दोन ब्लॉक ठेवून ती रुळावरुन खाली उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. ट्रेन ब्लॉक फोडून पुढे गेल्याने सुदैवाने दुर्घटना टळली. याप्रकरणी कर्मचाऱ्यांनी मांगलावियास पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. 

याआधी कालिंदी एक्स्प्रेस पलटी करण्याचा कट कानपूरमध्ये उघडकीस आला होता. 8 सप्टेंबर रोजी रात्री 8.30 च्या सुमारास प्रयागराजहून भिवानीकडे जाणारी कालिंदी एक्स्प्रेस रेल्वे रुळावर ठेवलेल्या एलजीपी सिलेंडरला धडकली आणि त्यानंतर स्फोट झाला. अनवरगंज-कासगंज रेल्वे मार्गावरील बराजपूर आणि बिल्हौर स्थानकांदरम्यान ही घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवला असून अनेक एजन्सी त्याचा पर्दाफाश करण्यासाठी तपासात गुंतल्या आहेत.

NIA करतीये कानपूरच्या घटनेचा तपास

कालिंदी एक्स्प्रेस बॉम्बस्फोटाच्या कटामागे आयएस या दहशतवादी संघटनेच्या खोरासान मॉड्यूलचा हात असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. त्यामुळेच इंटेलिजन्स ब्युरो (आयबी), राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए), यूपी एटीएससह अनेक एजन्सी कानपूरमध्ये तळ ठोकून आहेत आणि प्रत्येक बाजूने कटाचा तपास करत आहेत. सध्या तपास यंत्रणांना कोणताही महत्त्वाचा सुगावा लागलेला नाही.