काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाणप्रकरणी 'त्या' युवासैनिकांची हकालपट्टी

यवतमाळमधील काश्मिरी विद्यार्थ्यांसोबत घडलेला प्रकार हा दुर्देवी आहे.

Updated: Feb 22, 2019, 05:44 PM IST
काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाणप्रकरणी 'त्या' युवासैनिकांची हकालपट्टी title=

मुंबई : पुलवामा हल्ल्यानंतर महाराष्ट्रात शिक्षण घेत असलेल्या काश्मिरी तरुणांना मारहाण करणाऱ्या यवतमाळच्या युवासेनेच्या कार्यकर्त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. बडतर्फीची कारवाई केल्याची माहिती युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर वरुन दिली आहे. 

ट्विट मध्ये काय म्हणाले?

काल यवतमाळमधील काश्मिरी विद्यार्थ्यांसोबत घडलेला प्रकार हा दुर्देवी आहे. या घडलेल्या प्रकाराबद्दल आम्ही कालच पत्रक जारी केले. आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली.  हा मुद्दा फार नाजूक तसेच गंभीर आहे. पण आम्ही घेतलेल्या भूमिकेवरुन जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले जात आहे. या घटनांचे भांडवल करून आमचे नाव खराब करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

 

ज्यांनी त्या काश्मिरी तरुणांना मारहाण केली, त्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. जम्मू काश्मिर हा भारताचाच भाग आहे.  त्यामुळे दहशतवादी हल्ल्याचा राग काश्मिरी तरुणांवर काढणे  हे चुकीचे आहे. या दहशतवादी हल्ल्यामुळे प्रत्येक भारतीयाच्या मनात संतापाची भावना आहे. राग असणे साहजिक आहे, पण राग दहशतावादविरोधात असायला हवा, निर्दोषांवर नाही, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

नक्की काय घडले ?

बुधवार 20 फेब्रुवारीला यवतमाळ मधील वाघापूर येथील वैभव नगर परिसरात युवासेनेच्या  अतिउत्साही कार्यकर्त्यांनी  एका काश्मिरी  विद्यार्थ्याला मारहाण केली. त्याला वंदे मातरम तसेच भारत माता की जय अशा घोषणा देण्यासाठी दबाव देण्यात आला.  सदर प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. या सर्व प्रकरणाची तक्रार लोहार  पोलिस ठाण्यात देण्यात आली होती.