सचिन कसबे, झी मीडिया, पंढरपूर : राज्यात ऊस गाळप हंगाम सुरू होण्या पूर्वी ऊस तोड मजूर, मुकादम , वाहतूकदार यांच्या मागण्या मान्य करा अन्यथा साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही असा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.
साखर कारखान्याशी संबधित असलेल्या असंघटित कामगारांना न्याय देण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांनी आता या प्रश्नात लक्ष घातले आहे. या साठी त्यांनी सांगली सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावात ऊस तोड कामगारांच्या बैठका घ्यायला सुरूवात केली आहे. आज मंगळवेढ्यातील नंदेश्वर मध्ये बैठक झाली.
ऊस तोड मजूराची मजूरी फक्त टनाला २४० रूपये आहे. यामध्ये त्यांचे कुटूंब चालणार कसे ? त्यांना मजूरी वाढवून दिली पाहिजे. मुकादमाना ३७ % वाढ करावी तर वाहतूकदाराना १५० % वाढ द्यावी अशी मागणी आमदार पडळकर यांनी केली आहे. सध्या कोविड चे थैमान आहे. त्यासाठी साखर कारखान्याकडून कोविड हाॅस्पिटल उभारावे. ऊस तोड मजूराना जर क्वारनटाईन केले तर त्यांना त्या दिवसांची मजूरी द्यावी. तसेच ऊस तोड कामगार महिलांसाठी शौचालयाची उभारणी सुध्दा करणे गरजाचे आहे.
जर राष्ट्रवादी आणि काँग्रेस चे वर्चस्व असलेल्या साखर कारखानदारी उद्योजकांनी ऊस तोड कामगार, मुकादम आणि वाहतूकदार यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर साखर कारखाने सुरू करू देणार नसल्याचा इशारा आमदार पडळकर यांनी दिला आहे. यामुळे आता साखर कारखानादारा समोरील अडचणी वाढणार आहेत.