व्हिडिओ : मुंबई-गोवा महामार्गावर अपघात, आश्वासनानंतर ग्रामस्थांचं आंदोलन मागे

वाहतूक रोखून धरल्यानं मुंबई - गोवा महामार्गावर वाहतुकीची कोंडी दिसून येतेय

Updated: Jan 21, 2019, 02:01 PM IST
व्हिडिओ : मुंबई-गोवा महामार्गावर अपघात, आश्वासनानंतर ग्रामस्थांचं आंदोलन मागे title=

मुंबई : मुंबई - गोवा महामार्गावरील पेण तालुक्यातल्या जिते या गावाजवळ डम्पर आणि मोटार सायकल यांच्या धडकेत मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. यानंतर संतप्त गावकऱ्यांनी गेल्या दोन तासांपासून रस्ता रोखून धरला होता. मात्र मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आपलं आंदोलन मागे घेतलंय. ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतल्यानं रायगड - मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक तब्बल तीन तासांनंतर पुन्हा धीम्या गतीनं सुरू झालीय. धक्कादायक म्हणजे, आंदोलन सुरू असताना गावकऱ्यांनी मृतदेह जागेवरून हलवू दिला नाही... त्यामुळे हा मृतदेह दोन तासांपेक्षा जास्त वेळ डम्परच्या खाली अडकलेल्या अवस्थेत होता. 

आज सकाळी डम्पर आणि मोटार सायकलच्या धडकेत खारपाडा गावचे रहिवासी यशवंत घरत यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर संतापलेल्या गावकऱ्यांनी डम्परच्या काचा फोडल्या... तसंच डंपर चालकावर गुन्हा दाखल करून नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत वाहतूक रोखून धरणार, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली.

आंदोलनासाठी जिते, खारपाडा या गावांतील अनेक स्त्रिया, पुरुष आणि तरुण वर्ग इथं मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरला होता. त्यांनी वाहतूक रोखून धरल्यानं मुंबई - गोवा महामार्गावर वाहतुकीची कोंडी दिसून आली. कोकणात जाणारी आणि कोकणाकडून येणारी अशा दोन्ही बाजुंनी वाहतूक जवळपास ठप्प झाली होती. मुंबई - गोवा महामार्गावर जवळपास पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसून आल्या. यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. ग्रामस्थांना रस्त्यावरून हटवण्यासाठी अधिक पोलीस कुमक मागवण्यात आली होती. 

उल्लेखनीय म्हणजे, गेल्या काही वर्षांपासून मुंबई - गोवा महामार्गावर सुरू असलेलं रस्ता चौपदीकरणाचं काम सध्या रखडलेलं आहे. त्यामुळे या भागात सातत्यानं अपघाताचे प्रकार वाढलेले दिसून आलेत. 

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा