नाशिकमधील कांदाकोंडी 13 दिवसांनंतर फुटली; व्यापारी दोन पावलं मागे आल्याने शेतकऱ्यांना दिलासा

नाशिकमधली कांदाकोंडी 13 दिवसांनंतर फुटली, उद्यापासून नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समितीत कांदा लिलाव सुरू होणार आहे. 

Updated: Oct 2, 2023, 08:05 PM IST
नाशिकमधील कांदाकोंडी 13 दिवसांनंतर फुटली; व्यापारी दोन पावलं मागे आल्याने शेतकऱ्यांना दिलासा title=

Nashik onion traders strike: कांदा उत्पादक शेतक-यांसाठी मोठी दिलासा देणारी घडामोड घडली आहे. अखेर नाशिकमधील कांदाकोंडी 13 दिवसांनंतर फुटली आहे. उद्यापासून नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समितीत पुन्हा एकदा कांद्याचे लिलाव सुरू होणार आहेत. शेतक-यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून व्यापा-यांनी दोन पावलं मागे घेत आंदोलन मागे घेतले आहे.  यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.  कृषीमंत्री दादा भुसे यांनी पुन्हा एकदा कांद्याचे लिलाव सुरू होणार असल्याची घोषणा केली आहे. 

नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले आहे. व्यापाऱ्यांच्या कोर कमिटीची बैठकीत याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आले. कांदा व्यापा-यांनी आपल्या काही मागण्या सरकारसमोर ठेवल्या होत्या. यासंदर्भात दिल्लीत केंद्रीय स्तरावर बैठकही झाली. मात्र, कोणताही तोडगा निघू शकला नाही. त्यानंतर कांदा व्यापा-यांना आंदोलन सुरूच ठेवलं होतं. मात्र शेतक-यांचं वाढतं नुकसान लक्षात घेऊन आता कांदा खरेदी-विक्री सुरू करण्याचा निर्णय व्यापा-यांनी घेतला आहे.

नाशिक जिल्ह्यासह अहमदनगरमध्ये देखील बंद होते कांद्याचे लिलाव 

नाशिक जिल्ह्यासह अहमदनगरात कांद्याचे लिलाव बंद आहेत. व्यापाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी लिलाव बंद केलेत. कांदा निर्यातीवर लावण्यात आलेलं 40 टक्के निर्यात शुल्क कमी करावं ही प्रमुख मागणी व्यापाऱ्यांकडून करण्यात आली होती. कांदा निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावल्यामुळं राज्यातील राजकारण देखील पेटलं होते.