राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला; जिंकण्यासाठी दादांचा पावरफुल प्लान

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागलीय.. त्यामुळे एक वेगळीच खेळी खेळण्याच्या तयारीत अजित पवार आहेत. काय आहे दादांची नवी स्ट्रॅटेजी?

Updated: Oct 22, 2023, 09:21 PM IST
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर  अजित पवार यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला; जिंकण्यासाठी दादांचा पावरफुल प्लान title=

Ajit Pawar : लोकसभेला अजित पवार गटाच्या वाट्याला मोजक्याच जागा येऊ शकतात. त्यामुळे पदरी पडलेल्या जागा जिंकून आपली शक्ती वाढवण्याचा अजित पवार गटाचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीनंच लोकसभेसाठी नवीन चेह-यांना अजित पवार संधी देऊ शकतात. विशेषत: राज्यात लोकप्रिय असणा-या नावांना लोकसभेसाठी संधी दिली जाऊ शकते. यात अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार किंवा पत्नी सुनेत्रा पवारही निवडणुकीच्या मैदानात दिसू शकतात.

दादांची स्ट्रॅटेजी, कुणाला संधी?

बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध मुलगा पार्थ किंवा पत्नी सुनेत्रा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचा विचारही अजित पवार करत असल्याची माहिती आहे. शिरूर लोकसभा मतदार संघात अभिनेते अमोल कोल्हे हे शरद पवार गटाचे विद्यमान खासदार आहेत. त्यांच्याविरोधात अजित पवार गटाकडून सहकार मंत्री वळसे पाटलांना संधी मिळू शकते. 

या नेत्यांना  दादा देणार तिकीट?

साता-यात शरद पवार यांचे खास-विश्वासू अशी ओळख असणा-या श्रीनिवास पाटील यांच्याविरोधात रामराजे नाईक निंबाळकर किंवा नितीन पाटील यांना अजित पवार गटाकडून पसंती मिळू शकते. छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या इम्तियाज जलील यांच्याविरोधात विधानपरिषदेतील आमदार सतीश चव्हाण यांना तयारी करण्याच्या सूचनाही पक्षाने दिल्याचे समजतंय. तर, दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून सध्या काँग्रेसमध्ये असेलेले माजी खासदार मिलिंद देवरा यांना उतरवलं जाणार अशी चर्चा आहे. त्यांच्या प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत दोन बैठकही झाल्या असल्याची माहिती आहे.

राष्ट्रवादीमधील फुटीनंतरही राज्यातील चारपैकी 3 खासदार शरद पवारांसोबत

राष्ट्रवादीमधील फुटीनंतरही राज्यातील चारपैकी 3 खासदार अजूनही शरद पवारांसबोतच आहेत. सुनील तटकरे हे एकमेव खासदार अजित पवारांसोबत आहेत. त्यामुळे लोकसभेतील ताकद वाढवण्यासाठी स्मार्ट खेळी खेळण्याच्या तयारीत अजित पवार आहेत. ऐनवेळी उमेदवार जाहीर करण्यापेक्षा आधीच घोषणा करुन प्रचारात आघाडी घेण्याचा अजित पवार गटाचा प्रयत्न असल्याचं बोललं जातंय.

1991 पासून बारामती मतदारसंघावर पवार कुटुंबाचं एकहाती वर्चस्व 

1991 पासून बारामती मतदारसंघावर पवार कुटुंबाचं एकहाती वर्चस्व आहे. शरद पवार बारामती लोकसभा मतदारसंघातून 5 वेळा तर सुप्रिया सुळे 3 वेळा निवडून आल्यात. मोदी लाटेतही सुप्रिया सुळे बारामतीतून विक्रमी मतांनी निवडून आल्या. आता मात्र बारामती जिंकणं सुप्रिया सुळेंसाठी सोपं नसल्याची चर्चा आहे कारण ताईंचे थोरले भाऊ अजित पवार सुप्रिया सुळेंविरोधात मैदानात उतरणार आहेत. दादांची लोकप्रियता, त्यांची प्रतिमा, त्यांनी केलेली विकासकामं याजोरावर बारामतीचं मैदान मारण्याचा भाजपचा मनसुबा आहे. बारामतीत महाविजयाचा संकल्पच भाजपनं केलाय.