त्याला वाटलं हातात 37 कोटी रुपये येतील, पण पडल्या बेड्या

मनोरुग्णाला संपवून इन्शुरन्स कंपनीला वेडा बनवायला गेला, पण स्वत:च वेडा ठरला

Updated: Oct 25, 2021, 09:07 PM IST
त्याला वाटलं हातात 37 कोटी रुपये येतील, पण पडल्या बेड्या

अहमदनगर : इन्शुरन्सची मोठी रक्कम मिळवण्यासाठी एका व्यक्तीने मृत्यूचा बनाव रचला, त्यासाठी चक्क त्याने एका मनोरुग्णचा खून केला. पण रचलेल्या सापळ्यात तो स्वत:च अडकला आणि थेट तुरुंगात गेला. ही घटना घडली आहे अहमदनगरमध्ये. अहमदनगरमधल्या अकोले तालुक्यातील राजूर पोलिसांनी हा सर्व प्रकार उघडकीस आणला असून मुख्य आरोपीसह पाच जणांना अटक केली आहे.

अहमदनगरच्या अकोले तालुक्यातल्या राजूर मधील धामणगाव पाट या गावात हा  धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. गेल्या वीस वर्षापासून अमेरिकेत स्वयंपाकीची नोकरी करणाऱ्या प्रभाकर वाकचौरे यांनी 2013 साली बायकोचा 10 लाख डॉलरचा आणि स्वतःचा 50 लाख डॉलरचा अमेरिकेत ऑल स्टेट इन्शुरन्स कंपनीकडे इन्शुरन्स काढला. 

इन्शुरन्सचा क्लेम मिळावा यासाठी प्रभाकर आपल्या गावी आला. आपल्या 4 साथीदाराच्या मदतीने 4 महिने नियोजन करून त्याने कट रचला आणि एका मनोरुग्न व्यक्तीचा विषारी सापाच्या दंशाने खुन करून स्वतःचा मृत्यू झाल्याचे पुरावे तयार केले. हे पुरावे आणि कागदपत्र वाकचौरे याने इन्शुरन्स कंपनीकडे सादर केले. 

मात्र याची पडताळणी करताना या प्रकरणात काहीतरी गडबड असल्याचा संशय इन्शुरन्स कंपनीला आल्याने त्यांनी राजूर पोलिसांची मदत घेतली. राजूर पोलिसांनी तपास केला त्यावेळी प्रभाकर वाघचौरे जिवंत असल्याचं समोर आलं. पोलिसांनी प्रभाकरला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर प्रभाकर आणि त्याच्या 4 साथीदारांनी नवनाथ अनप या मनोरुग्णाची विषारी सापांच्या दंशाने हत्या केल्याची कबुली दिली आणि घडलेला सर्व धक्कादायक प्रकार समोर आला

प्रभाकर वाकचौरे याने इन्शुरन्सचे 37 कोटी रुपये मिळवण्यासाठी एका मनोरुग्ण व्यक्तीची हत्या केली आणि सर्व बनाव केला. या घटनेमुळे अहमदनगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.